पुण्यातील साखर संकुलात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात महत्त्वाची बैठका झाल्याची माहिती मिळत आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कामकाजासंबंधी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अधिकारी देखील उपस्थित होते. साखर संकुलातील बैठकीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात वेगळी बैठक देखील झाली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
आज सोमवारी (दि. 21) सकाळी सर्वात आधी एआय तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रात कसा वापर करावा? या संबंधित बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कामकाजासंदर्भात काही अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात वेगळी महत्त्वाची बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवार हे जाहीरपणे शरद पवार यांच्यासोबत बैठक आणि कार्यक्रमांना उपस्थित राहत आहेत. या आधी अजित पवार शरद पवारांसोबत बैठका किंवा कार्यक्रम टाळत असल्याचे दिसून येत होते. वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला अजित पवार हे उपस्थित राहत नव्हते. मात्र मागील बैठकीला अजित पवार हे बैठकीला आले आणि त्यांनी शरद पवार यांच्यासोबत बैठकीत चर्चा देखील केली होती. त्यानंतर सातारा येथे रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत अध्यक्ष म्हणून शरद पवार उपस्थित होते. तर कार्यकारी मंडळावर अजित पवार असल्याने ते देखील त्या बैठकीला उपस्थित होते. आता पुन्हा अजित पवार आणि शरद पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला एकत्र उपस्थित राहिले आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या एक वेगळी बैठक देखील सुरू आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांनी भाषणात बोलताना काकांचा आशीर्वाद घ्यावा लागतो, असे वक्तव्य केले होते. एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. तर आता पवार काका पुतण्याचेही मनोमिलन होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


