घर म्हणजे फक्त चार भिंती नाहीत, तर साठलेल्या आठवणी प्रेम, आपुलकी व तयार झालेली नाती त्या भिंतींमध्ये असतात. पण, जेव्हा एकाच घरात हिश्शांचा प्रश्न येतो तेव्हा लोकांची मनेदेखील दुखावली जातात. हिस्सा हा शब्द ऐकायलाच जड आहे. तो जर भावंडांचा असेल, तर वेदना अजूनच वाढतात.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ पाहून नेटकरी अक्षरशः थक्क झाले आहेत. कारण- या व्हिडीओत दाखविलेला प्रसंग कुठल्याही चित्रपटातील नाही, तर खऱ्या आयुष्यातील आहे. हा व्हिडीओ दोन भावांमधील हिश्शांशी संबंधित आहे. घरच्या भांड्यांपासून ते रोजच्या वापरातील वस्तू एकेक करून वाटून घेतल्या जात आहेत, असं या व्हिडीओत दिसतं.
हा व्हिडीओ पाहून अनेकांना जुन्या आठवणी, चित्रपटातील प्रसंग आणि स्वतःच्या आयुष्यातील अनुभव आठवले. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती जमिनीवर बसून घरातील भांडी, साहित्य दोन वेगवेगळ्या बाजूला ठेवताना दिसते आणि प्रत्येक भांडे एकेक करून दोन बाजूंना अलगद ठेवत असते. आजूबाजूला काही लोक उभे आहेत, जे हे सगळं गप्पपणे पाहत आहेत.कुणाच्या चेहऱ्यावर आनंद नाही, हसू नाही फक्त एक शांत,आणि चेहऱ्यावर दु:ख आहे. हा प्रसंग पाहताना असे वाटते की, भांड्यांसोबतच नात्यांचाही हिशोब केला जातोय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट झाल्यानंतर काही वेळातच हजारो लोकांनी तो पाहिला, लाईक केला आणि त्यावर प्रतिक्रिया दिल्या. प्रतिक्रियांमध्ये अक्षरशः लोकांनी भारावून प्रतिक्रिया दिल्या.
एका युजरनं लिहिलं, “फक्त पाहूनच मन भरून आलं. हे सगळं किती दुखत आहे.” दुसऱ्या युजरनं म्हटलं, “आपण लहानपणी चित्रपटात पाहायचो, आज प्रत्यक्षात पाहिलं आणि मन भारावून गेलं.” काहींनी पालकांचा विचार करीत दुःख व्यक्त केलं.“आई-वडील आयुष्यभर मुलांना एकत्र राहण्याचं शिकवतात आणि शेवटी असं दृश्य त्यांना पाहायला मिळतं,” अशी भावना अनेकांनी मांडली.


