अहिल्यानगर महावितरण कंत्राटी कामगारांना नियमित कर्मचाऱ्याचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा

अहिल्यानगर- महावितरण कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करत असलेल्या कामगारांना नियमित कर्मचारी घोषित करत त्यांना नियमितची वेतनश्रेणी, पदोन्नती, वेतन फरक असे सर्व लाभ देण्याचे आदेश ठाणे औद्योगिक न्यायालयाने दिले आहेत. या आदेशानुसार अहिल्यानगर महावितरण कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या २९ कामगारांना नियमित कर्मचाऱ्याचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील सहा महिन्यांत आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत न्यायालयाने कंपनीला सुचित केले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राष्ट्रवादी वीज कामगार मजदूर कॉंग्रेसचे राज्य संघटक सुनिल वाघमारे यांनी दिली आहे.
या संदर्भात महावितरणच्या नगरमधील कंत्राटी कामगारांनी न्यायालयाच्या आदेशाची प्रत महवितरणचे अधिक्षक अभियंता रमेश पवार व कार्यकारी अभियंता योगेश चव्हाण यांना सोमवारी ( दि. १५ ) सादर केली. यावेळी संघटनेचे राज्य संघटक सुनिल वाघमारे यांच्यासह कामगार उपस्थित होते.
न्यायालयाचा निकाल काय?
या संदर्भात निकाल देताना न्यायालयाने सर्व कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचारी म्हणून घोषित केले आहे. नोकरीत लागलेल्या दिनांकापासून 240 दिवस भरतील त्या दिवशीपासून कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांना लागू असलेली वेतनश्रेणी, पदोन्नतीचे लाभ, वेतनाचे फरक आदी लागू केले आहेत. पुढील 6 महिन्यात कोर्टाच्या आदेशानुसार महावितरण कंपनीला कार्यवाही करण्याचे आदेश निर्गमित झाले आहेत. कोर्टाच्या आदेशानुसार महावितरणकडून अमलबजावणी न झाल्यास कोर्टात केस उभी झालेल्या दिवसापासून म्हणजे दि.28.09.2012 पासून सर्व कर्मचाऱ्यांना देय असलेल्या सर्व देणी रक्कमेवर ती अदा होण्याच्या दिनांकापर्यंत वार्षिक 5% व्याजाची आकारणी होणार आहे.
नगरमधील हे कामगार होणार कायम
या आदेशानुसार नगरमधील ज्ञानेश्वर जनार्दन दहीवळकर, उकीर्डे सुभाष नामदेव, दळवी प्रसाद विलास, मच्छिंद्र शामराव जगताप, भिंगारदिवे सुनिल नानासाहेब, शरद मधूकर आवारे, कदम दिपक पोपट, प्रविण अरविंद बेद्रे, गणेश भिमराव पंचमुख, अनिल यादव झेंडे, कुपाडे नंदकिशोर आनंद, कैलास पंढरीनाथ माने, परभाणे आबासाहेब भाऊसाहेब, राजेंद्र जगन्नाथ नन्नवरे , श्रीराम केशव वासकर, सोनवणे प्रकाश भागाजी, कुडाळ भास्कर पांडूरंग, चौधरी दिनेश पोपट, बेलोटे खंडू सखाराम, शिंदे कैलास अण्णासाहेब, मुळे सुरेश भाऊ, केदार सखाराम शिवाजी, ढूस संदीप रावसाहेब, घेमुड किसन अण्णासाहेब, गागरे गणपत गेणू , खेसे सुरेश कोंडीबा, गायकवाड भगवंत तुकाराम, भिंगारदिवे राहूल अशोक, डेरे संजय श्रीपत या कामगारांना लाभ मिळणार आहे.
१३ वर्षाच्या संघर्षानंतर आले यश
मागील १३ वर्षांपासून महाराष्ट्र राष्ट्रवादी वीज कामगार मजदुर काँग्रेस, (इंटक प्रणित संघटना) मुख्य कार्यालय,इंटक भवन,80 फुटी रोड, विश्रामबाग सांगली या संघटनेच्यावतीने कंत्राटी पद्धतीने दाखवलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना महावितरण कंपनीत सामावून घेण्यासाठी मे २०१२ साली मुंबईत महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर व आझाद मैदानावर जवळपास 1 महिना आंदोलन केले. निशिकांत भोसले- पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच इंटक संघटनेचे सर्व पदाधिकारीसह आंदोलन केले होते. या आंदोलनास त्यावेळचे SEA संघटनेचे वरीष्ठ नेते आशीष जयंत मेहता (सध्या कार्यकारी अभियंता, सांगली शहर) यांनी देखील पाठिंबा दिलेला होता. कामगार महासंघाचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब देसाई यांनीही आपल्या मागणीला पाठिंबा दिलेला होता. सदर आंदोलनाच्या मार्गाने न्याय मिळण्यापूर्वीच कंपनीने अनुभवी कर्मचारी डावलुन भरती प्रक्रिया राबवली. त्यामुळे सदर प्रक्रिया थांबवण्यासाठी आपले आंदोलन आझाद मैदानातून न्यायदेवतेच्या मंदिरात गेले. मुंबई उच्च न्यायालयात आपण संघटनेच्या माध्यमातून याचिका दाखल केली. ही याचिका ठाणे औद्योगिक न्यायालयात बऱ्याच वर्षांपासून सुरू होती. संघटनेकडून वकील श्री. गायकवाड यांनी कामगारांच्यावतीने उत्कृष्ट युक्तिवाद केला आहे. तसेच ठाणे येथील स्थानिक वकिल सौ.स्मिता डंखे ऊर्फ पाराठकर मॅडम यांचेही भरपुर सहकार्य लाभले. ठाणे औद्योगिक न्यायालयाने केसचा निकाल महाराष्ट्र शासनास सादर केला होता व त्याची अधिकृत घोषणा महाराष्ट्र शासनाच्या (कामगार आयुक्त) कामगार मंत्रालयाकडून जाहीर होणार होती. सर्व कर्मचारी बांधवानी महावितरण कंपनीमध्ये सामावून घ्यावे यासाठी केलेली धडपड, घेतलेले कष्ट, संघटनेची निस्वार्थ भूमिका, कोर्टात केवळ आपल्या संघटनेच्या माध्यमातून व योग्य वकिलांच्या मदतीने यशस्वीपणे मांडलेला युक्तिवाद, सर्वांनी दाखवलेला विश्वास याचेच फलित म्हणून ठाणे औद्योगिक न्यायालयात बलाढ्य महावितरण विरुद्ध ऐतिहासिक विजय प्राप्त केलेला आहे असे वाघमारे यांनी म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles