अहिल्यानगर पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्याचे रात्रगस्त घालताना अपघाती निधन

अहिल्यानगर पोलिस दलात कर्जत पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी सुदाम राजू पोकळे (वय २९, मूळ रा. चिंचाळा, ता.आष्टी, जि.बीड) यांचे राशीन करमाळा रस्त्यावर रात्रगस्त घालत असताना १९ डिसेंबर रोजी पहाटे २ च्या सुमारास अपघाती निधन झाले आहे.

मयत सुदाम पोकळे हे कर्जत पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या राशीन पोलिस चौकी येथे कर्तव्यावर होते. १८ डिसेंबरला रात्री त्यांची रात्र गस्तीसाठी ड्युटी होती. पहाटे २ च्या सुमारास राशीन ते करमाळा रस्त्यावर महात्मा फुले चौकात रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला मोटारसायकल उभी केलेली असल्याने ते पायी रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात आलेल्या एका पिकअप वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी होवून जागीच मयत झाले. या अपघाताची माहिती मिळताच कर्जत पोलिस ठाण्यातील त्यांचे सहकारी पोलिस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या चिंचाळा गावातीलही अनेक जण तेथे गेले होते.

कर्जत ग्रामीण रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन केल्यावर १९ डिसेंबर रोजी त्यांच्यावर त्यांच्या मुळगावी चिंचाळा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस दलाने त्यांना बंदुकीतून हवेत फैरी झाडून मानवंदना दिली. शहीद पोकळे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, १ मुलगी असा परिवार आहे.

कर्तव्यनिष्ठ पोलिस कर्मचारी सुदाम राजू पोकळे यांचा रात्री कर्तव्य बजावत असताना झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायक आहे. समाजाच्या सुरक्षिततेसाठी अखेरच्या श्वासापर्यंत झटणाऱ्या या शूर जवानाच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून चिंचाळा गाव, आष्टी तालुका तसेच संपूर्ण पोलिस दल शोकाकुल झाले आहे.अशा शब्दात आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी सोशल मिडीयावर शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles