जामखेड येथे फायरिंग करणारे 03 आरोपी गावठी कट्टयासह स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांचेकडुन जेरबंद.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, 18/12/2025 रोजी फिर्यादी श्री रोहित अनिल पवार रा.कान्होपात्रानगर, जामखेड, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर हे त्यांचे जामखेड बिड रोडवरील हॉटेल न्यु कावेरी, या ठिकाणी असतांना हॉटेलसमोर आरोपींनी येवुन व त्यांचेकडील गावठी कट्टा काढुन फिर्यादीस जिवे ठार मारण्याचे उद्देशाने फिर्यादीचे दिशेने फायर करुन फिर्यादीस दुखापत केली आहे. सदर घटनेबाबत जामखेड पोलीस ठाणे गु.र.नं. 669/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109, 189(2), 191 (2), 190, 324(5), 351(2)(3) सह भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर मा. श्री सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, पोनि/श्री किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी तात्काळ घटनाठिकाणी भेट देवुन घटनाठिकाणची पाहणी केली. तसेच स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेणेबाबत आदेशित केले होते.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी याचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार अतुल लोटके, शामसुंदर जाधव, बाळासाहेब गुंजाळ, मनोज साखरे, सागर ससाणे, योगेश कर्डीले, प्रशांत राठोड, महादेव भांड, चंद्रकांत कुसळकर यांचे पथक तयार करुन सदर पथकास आरोपीचा शोध घेवुन आरोपीस ताब्यात घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन रवाना केले.
नेमण्यात आलेले पथक दिनांक 18/12/2025 रोजी गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असतांना गुन्ह्यातील आरोपी उल्हास माने हा जामखेड रोड, आष्टी परिसरामध्ये असल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ आष्टी या ठिकाणी जावुन आरोपीचा शोध घेतला असता हॉटेल साईराज समोर गुन्ह्यातील आरोपी मिळुन आला. त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव उल्हास उर्फ वस्ताद विलास माने वय 49 वर्षे, रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले आहेत. त्यास गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्याने त्याचे इतर साथीदारांसोबत गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
त्यानंतर उर्वरीत आरोपींचा शोध घेत असतांना दिनांक 19/12/2025 रोजी शुभम लोखंडे व बालाजी साप्ते हे वाळुंज गांवचे शिवारात अहिल्यानगर ते सोलापुर जाणारे रोडवरील हॉटेल शाम परिसरामध्ये आलेले असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता दोन इसम मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) शुभम शहाराम लोखंडे वय 26 वर्षे, रा. आष्टी कमान वेशीसमोर, आष्टी, ता. आष्टी, जि. बीड, 2) बालाजी शिवाजी साप्ते वय 27 वर्षे, रा. तेली गल्ली, पांढरे मेडिकलचे पाठीमागे, आष्टी, ता. आष्टी, जि. बीड असे असल्याचे सांगितले.
वरील ताब्यातील आरोपींचे कब्जातुन गुन्ह्यामध्ये वापरलेला 30,000/- रुपये किमतीचा एक गावठी कट्टा, 20,000/- रुपये किमतीचा फिर्यादीचा काढुन नेलेला सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्याचा डी.व्ही.आर. असा एकुण 50,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ताब्यातील आरोपींना जामखेड पोलीस ठाणे गु.र.नं. 669/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109, 189(2), 191 (2), 190, 324(5), 351(2)(3) सह भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्ह्याचे तपासकामी जामखेड पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.


