Friday, October 31, 2025

नगर शहरात महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने जवानांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके दाखवून अग्नीसुरक्षेचे दिले धडे

अग्निशमन सेवा सप्ताहात आग प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती

जवानांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके दाखवून अग्नीसुरक्षेचे दिले धडे

इमारती, घरांच्या बांधकामावेळी अग्नीसुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे

अहिल्यानगर – अग्निशमन सेवा सप्ताहाच्या निमित्ताने १५ एप्रिल ते २० एप्रिल या कालावधीत शहरात महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने नागरिकांमध्ये आग प्रतिबंधात्मक उपाययोजना, अग्नी सुरक्षेबाबत घ्यावयाची काळजी आदींबाबत जनजागृती करण्यात आली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके दाखवून अग्नी सुरक्षेचे धडे देण्यात आले. प्रत्येक घर, इमारत ती व्यावसायिक असो अथवा निवासी असो, सर्वांनी बांधकाम करताना अग्नी सुरक्षेचा गांभीर्याने विचार करून तशा उपाययोजना कराव्यात. यातून आगीची घटना घडल्यास त्यावर तत्काळ नियंत्रण मिळवण्यास मदत होईल, असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले.

१५ एप्रिल ते २० एप्रिल २०२५ या कालावधीत अहिल्यानगर महानगरपालिका अग्निशमन दलाच्या विभागाने राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताह राबवला. या निमित्ताने न्यू आर्ट कॉमर्स ॲन्ड सायन्स कॉलेज येथील महाविद्यालयातील भूगोल विभागाकरिता अग्निशमन सुरक्षितता, सुरक्षा प्रशिक्षण, प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत प्रात्यक्षिके आणि प्रशिक्षण देण्यात आले. तसेच मॉक ड्रिलचे आयोजन करून कॉलेजमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना आग लागल्यास तात्काळ करावयाची कार्यवाही, अग्निशामक यंत्रांचा वापर, सुरक्षित रितीने बाहेर पडण्याच्या उपाययोजना याविषयी सखोल माहिती देण्यात आली. प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आल्यामुळे विद्यार्थी, नागरिकांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जागरूकता आणि आत्मविश्वास वाढीस मोठी मदत होणार आहे. यावेळी मुख्यअग्निशमन अधिकारी शंकर मिसाळ, वाहन चालक चिंधू भांगरे, फायरमन शुभम गावडे, दिनेश शिंदे, अविनाश साठे, सागर भिंगारदिवे, तसेच धीरज जावळे व संकेत साठे यांनी प्रभावी मार्गदर्शन केले.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असून आगीच्या घटना घडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी उघड्यावर, काटवणात कचरा पेटवू नये. यातील मोठी आग लागून हरित क्षेत्राचे नुकसान होऊ शकते. निवासी क्षेत्रात असे प्रकार केल्यास यातून आगीची मोठी दुर्घटना घडू शकते. तसेच, कचरा जाळणे हा गुन्हा असून, संबंधितावर फौजदारी कारवाई होऊ शकते. आगीच्या घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles