विशेष सेमिनारमध्ये तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन
नगर – बारावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सावेडी येथील माऊली सभागृह येथे विशेष करिअर सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थी व पालकांनी भविष्यातील करिअर संधीची माहिती वक्त्यांकडून जाणून घेतली.
एम.आय.टी – ए.डी.टी विद्यापीठ पुणे, पी.टी.ए.म अहिल्यानगर व ॲडमिशन सजेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १२ वी विज्ञानच्या विद्यार्थी व पालकांसाठी करिअर मार्गदर्शन सेमिनारमध्ये मान्यवरांनीं बारावीनंतरच्या उपलब्ध संधी, प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती, आवश्यक कागदपत्रे अशा विविध विषयावर तज्ञ मार्गदर्शक यांच्याकडून सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी एमआयटी ए.डी.टी विद्यापीठाचे प्रा. डॉ. उल्हास माळवदे यांनी संस्थेविषयी माहिती देताना अभियांत्रिकी प्रवेशावेळी मेरिट लिस्ट, लागणारी कागदपत्रे, स्तलांतरित प्रमाणपत्र आदींची जुळवणूक कशा पद्धतीने केली जावी याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. प्रतिभा जगताप यांनी करिअर इन नेव्ही यावर सखोल मार्गदर्शन केले. प्रा. जीवन पाटील यांनी बायो इंजिनीअरिंग या विषयाचे महत्त्व विशद केले. तर प्रा. राहुल ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भाष्य करत एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. घोणसे मॅथ अकॅडमीचे संचालक प्रा. घोणसे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ॲडमिशन सजेशन संचालक अक्षय भंडारी यांनी विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म कसे भरावे, ब्रांच व कॉलेज कसे निवडावे यावर टिप्स देत. तुम्हाला भविष्यात काय शिकायचे, काय बनायचे आहे हे आधी एकाग्रपणे ठरवा. त्यानंतर पुढील दिशा ठरवा असे नमूद करत सर्वांचे आभार मानले. यावेळी विद्यार्थी व पालकांनी मान्यवरांशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवादही साधला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व सह्याद्री इंटरनॅशनल ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य प्रा. बाळासाहेब कीर्तने , तसेच प्रा. विजय कांडके , प्रा. प्रकाश जोशी , प्रा. नारायण शिनगारे, प्रा. मनोज पाटील, प्रा. प्रसाद चौधरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.


