Friday, October 31, 2025

कर्जत-जामखेडमधील पाणीप्रश्नासह विविध प्रश्नांबाबत आमदार रोहित पवार यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

कर्जत-जामखेडमधील पाणीप्रश्नासह विविध प्रश्नांबाबत आमदार रोहित पवार यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

पोलीस अधीक्षकांचीही घेतली भेट

जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण )

जामखेड ता.२५ – पाणी टंचाईसह कर्जत-जामखेड मतदारसंघातील विविध प्रश्नांसाठी आमदार रोहित पवार यांनी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि हे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. तसेच मतदारसंघातील पोलीस विभागाशी संबंधित विषयांवर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचीही भेट घेऊन चर्चा केली.

आमदार रोहित पवार हे मतदारसंघातील विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी कायमच अधिकारी, मंत्री यांच्या भेटी घेत असतात. गुरुवारी त्यांनी अहिल्यानगरमध्ये जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली. सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड मोठी असल्याने पिण्याच्या पाण्याची अनेक गावांमध्ये तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. आमदार रोहित पवार यांनी वैयक्तिक स्वरुपात अनेक गावांमध्ये पाण्याचे टँकर सुरु केले असले तरी अद्याप एकही सरकारी टँकर सुरु झालेला नाही. त्यामुळे मागणी असलेल्या गावांमध्ये तातडीने टँकर सुरु करण्याची आग्रही मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. शिवाय कुकडी आणि सीना कालव्यातून उन्हाळी आवर्तन सोडण्यासाठी आमदार रोहित पवार यांचा अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरु आहे. मात्र अद्याप आवर्तन सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे सध्याच्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पिकांसाठी आणि जनावारांना व माणसांना पिण्यासाठी या दोन्ही कालव्यातून तातडीने उन्हाळी आवर्तन सोडण्याची मागणीही त्यांनी केली. याशिवाय जनावारांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाल्याने चारा छावण्या तातडीने सुरु करण्याचीही मागणी आमदार रोहित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेक एजंटांची मध्यस्ती वाढली असल्याने यामुळे नागरिकांची फसवणूक होते. हे टाळण्यासाठी या एजंट लोकांना आळा घालावा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. याशिवाय कर्जत आणि जामखेडच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये शवविच्छेदन करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला आणि तातडीने मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची विनंती केली. पोटखाराबा दुरुस्ती प्रक्रिया लांबणीवर टाकली जात असल्याने शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळं ही प्रक्रिया तातडीने पार पाडण्याची गरज आहे. तसेच शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आता फार्मर आयडी बंधनकारक आहे. परंतु फार्मर आयडी काढताना सॉफ्टवेअरमध्ये वर्ग २ च्या जमिनींची किंवा पोटखराबा असलेल्या जमिनींची नोंद दिसत नाही. ही तांत्रिक अडचण दूर करण्याची विनंतीही आमदार रोहित पवार यांनी केली.

गेल्याच आठवड्यात घोड कालव्यात बुडाल्याने ताजू गावातील प्रियांका व नकोशा साबळे या सख्ख्या बहिणींचा तर त्यांना वाचवण्यासाठी गेले असताना कृष्णा पवळ या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. या सर्वांना तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणीही आमदार रोहित पवार यांनी केली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर आमदार रोहित पवार यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचीही भेट घेऊन कर्जत-जामखेडमधील कायदा व सुव्यवस्था, अवैध वाळू उपसा, गावगुंडांचा त्रास, पोलीस प्रशासनाविरोधात नागरिकांच्या वाढत्या तक्रारी याबाबत चर्चा केली. तसेच खर्डा व मिरजगाव येथे मंजूर झालेल्या पोलीस ठाण्यांच्या इमारती सध्या भाड्याने घेतलेल्या जागेवर कार्यरत आहेत. याठिकाणी हक्काची पोलीस ठाण्याची इमारत व्हावी यासाठी सुरु असलेल्या पाठपुराव्याची माहीतीही त्यांना दिली आणि सबंधित तांत्रिक बाबींच्या पुर्ततेसाठी सहकार्य करण्याची विनंती केली. मतदारसंघातील या सर्व प्रश्नांवर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच या प्रश्नांची सोडवणूक होईल असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

‘‘मतदारसंघात पाणी, टँकर, चारा, उन्हाळी आवर्तन, फार्मर आयडी, एजंटांची सुळसुळाट असे अनेक प्रश्न आहेत. परंतु पदावर असलेल्या काही नेत्यांना या प्रश्नात लक्ष घालण्याऐवजी राजकीय फोडाफोडीतच अधिक रस असल्याचे दिसते. परंतु कर्जत-जामखेडकरांनी टाकलेल्या विश्वासामुळं त्यांच्याशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी साहेब आणि पोलीस अधीक्षक साहेब यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळं पुढील काही दिवसात हे प्रश्न सुटतील अशी अपेक्षा आहे . रोहित पवार ( आमदार – कर्जत – जामखेड )

पोलीस निरीक्षक महेश पाटील भाजपचा कार्यकर्ता

जामखेड शहर दहशतीखाली आहे. अनेक गॅंग तेथे कार्यरत आहे. छोटेमोठे व्यावसायिकाकडून हप्ते वसूल करणे, जमिनीचा ताबा टाकणे, मारामाऱ्या असे प्रकार तेथे वाढले आहे. पोलीस निरीक्षक पाटील हेच तेथे हप्ते घेत आहेत. त्यांनी जनतेच्या हिताचे कामे करणे आवश्यक आहे पण ते खाकी वर्दीतील भाजपचे कार्यकर्ते आहेत. अशा “फालतू” पोलीस निरीक्षकाची बदली करा म्हणतोत पण केली जात नाही तेथे राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. यास प्रा. राम शिंदे सुध्दा कोठेतरी जबाबदार आहेत . अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली .

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles