Saturday, February 21, 2026

अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने खासदार नीलेश लंके भावूक

“अजितदादा म्हणजे कार्यकर्त्यांची ढाल!”

दिलदारपणा, शब्दाला जागणं आणि माणुसकीचा झरा हरपला

खासदार नीलेश लंके भावूक

पारनेर : प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या राजकारणात दिलदारपणा, माणुसकी आणि कार्यकर्त्याला न्याय देणारे नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. “अजितदादांचे जाणे ही केवळ त्यांच्या कुटुंबाची नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राची हानी आहे,” अशा शब्दांत खासदार नीलेश लंके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अजितदादांसोबतचा प्रदीर्घ राजकीय आणि भावनिक प्रवास उलगडताना लंके भावूक झाले.

चौकट

राजकीय मतभेद, पण आपुलकी कायम

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या निमित्ताने अजितदादांसोबत शेवटची भेट झाल्याचे सांगताना लंके म्हणाले की, “मी शरद पवार यांच्या गटाचा खासदार असतानाही अजितदादांनी मला नेहमी मदत केली. राजकीय मतप्रवाह वेगळे असले, तरी दादांचे प्रेम आणि आपुलकी कधीच कमी झाली नाही.” विधानसभेत आमदार म्हणून काम करत असताना अजितदादांनी मला सर्वात जवळचा आमदार मानून सातत्याने निधी दिला, हे त्यांनी आवर्जून नमूद केले.

चौकट

उमेदवारीचा शब्द… आणि शब्दाला जागणारा नेता

शिवसेना पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर पुढचा मार्ग काय, हा प्रश्न उभा राहिला असताना रमेश थोरात यांच्या माध्यमातून अजितदादांची भेट झाल्याची आठवण लंके यांनी सांगितली. “गेल्या तीन निवडणुकांत राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत झाला आहे. मी सर्वेक्षण करून तुला कळवतो,” असे दादांनी सांगितले. सर्वेक्षणानंतर ‘नीलेश, तू फार पुढे आहेस, तुझी उमेदवारी फायनल’ अशी ग्वाही दादांनी दिली. उमेदवारीचा शब्द दिल्यानंतर पक्षप्रवेशालाही येण्याचे त्यांनी मान्य केले होते, मात्र ते शक्य झाले नाही.

चौकट

‘तर मी बारामतीतून लढणार नाही!’

नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात पुन्हा भेट झाल्यावर लंके यांनी थेट प्रश्न विचारला “दादा, माझी उमेदवारी पक्की आहे ना?” त्यावर अजितदादांनी दिलेले उत्तर आजही लंके यांच्या मनात कोरलेले आहे. “जर मी तुला उमेदवारी देऊ शकलो नाही, तर मी बारामतीमधून उमेदवारी घेणार नाही.” हा शब्द अजितदादांच्या व्यक्तिमत्त्वाची साक्ष देणारा असल्याचे लंके म्हणाले.

चौकट

विधानसभेतील वाटचाल आणि विकासाचा डोंगर

विधानसभेत विजयी झाल्यानंतर कसे काम करायचे, प्रशासनाशी कसे वागायचे, विकासकामांचा वेग कसा वाढवायचा याचे मार्गदर्शन अजितदादांनी केले. “मी आमदार असताना जो विकासाचा डोंगर उभा राहिला, त्याचे श्रेय एकट्या अजितदादांनाच आहे. आजही पारनेर-नगर मतदारसंघात सुरू असलेली अनेक कामे दादांमुळेच मार्गी लागली,” असे लंके यांनी स्पष्ट केले.

चौकट

फुटीनंतरही दादांसोबत ठाम उभे

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आम्ही ठरवले की दादांसोबतच उभे राहायचे, असे सांगत लंके म्हणाले, “दादा हे भविष्यातील चेहरा आहेत, हे ओळखून आम्ही त्यांना साथ दिली.”

लोकसभेचा निर्णय आणि पाठिशी उभा राहणारा दादा

लोकसभा निवडणुकीवेळी शरद पवार यांचा फोन आला. “तू माढ्याकडून लढ,” अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. ही इच्छा दादांपर्यंत पोहोचवल्यावर दादांनी स्पष्ट सांगितले, “तुला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. कोणी सोसायटीचाही राजीनामा देत नाही, पण तरीही पवार साहेबांसाठी तू निवडणूक लढव. मी तुझ्या पाठीशी आहे.” लोकसभेला दादांनी भरभरून मदत केली, हे आज बोलण्यासारखे नसले तरी विसरण्याजोगे नाही, असे लंके म्हणाले.

विजयानंतरचा फोन… आणि पाठीवरची थाप

लोकसभा निकालानंतर दादांचा फोन आला. “अभिनंदन पठ्ठ्या! पवार साहेबांचे स्वप्न पूर्ण केलेस. तुझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा,” असे शब्द अजूनही कानात घुमत असल्याचे लंके म्हणाले. विधानसभा निवडणुकीत दादांनी माझ्या विरोधात सभा घेतल्या, मात्र वैयक्तिक टीका कधीच केली नाही. निवडणुकीनंतर पारनेरला आल्यावर “नीलेश, व्यासपीठावर तू नसशील, तर मजा नाही,” असे सांगणारे दादा म्हणजे माणुसकीचा कळस होते.

कोरोना काळातही काळजीवाहू दादा

कोरोनाच्या संकटात दादांची माणुसकी पुन्हा दिसली. “कोणी भेटायला आला की दादा त्यांना सांगत, नीलेश लंकेच्या कोरोना सेंटरला मदत करा,” असे सांगताना लंके भावूक झाले. मास्क घाल, स्वतःची काळजी घे, असे फोन करून वारंवार सांगणारा नेता आज आपल्यात नाही, ही सल कायम बोचत राहील.

दादांचा आधार हरपला

“राजकीय आणि सामाजिक जीवनात दादांनी मला प्रचंड साथ दिली. आमदार झाल्यावर मुंबईला पोहोचलो की सकाळी फोन करून विचारायचे किती वाजता पोहोचलास? लवकर येत जा, उशीर करू नकोस,” अशी आठवण सांगताना लंके यांचा आवाज भरून आला. राष्ट्रवादीत दोन गट झाले, तरी विचार मात्र एकच राहिले, असे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्राची मोठी हानी

अजितदादा पवार यांचे अपघाती निधन ही केवळ एका नेत्याची नाही, तर कार्यकर्त्यांना बळ देणाऱ्या, शब्दाला जागणाऱ्या आणि माणुसकी जपणाऱ्या नेतृत्वाची अकाली एक्झिट आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles