राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनंतात विलीन झाले आहेत. परंतु त्यांच्या निधनानंतर आता त्यांचा राजकीय वारसदार कोण असा प्रश्न विचारला जात आहे. त्यासंबंधी पडद्यामागे राजकीय हालचालीही सुरू झाल्या आहेत. त्यातच आता सुनेत्रा पवारांनाच उपमुख्यमंत्री करा अशी एक मागणी जोर धरताना दिसत आहे. राज्यसभेवर असलेल्या सुनेत्रा पवार यांना पक्षाच्या हंगामी अध्यक्ष करावे आणि त्यांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूकही लढवावी अशी मागणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अजित पवारांच्या अकाली निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याचं चित्र आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू असताना, तशी पावलंही पडत असताना अजित पवारांचे निधन झाले. त्यामुळे आता त्यांचा राजकीय वारसदार कोण याची चर्चा सुरू झाल्याचं दिसतंय.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. तर नरहरी झिरवाळांनी सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री करा अशी मागणी केली. त्यामुळे सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादीचे हंगामी अध्यक्ष केलं जाण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे. सुनेत्रा पवार या सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत. तर अजित पवारांचे दोन्ही पुत्र, पार्थ आणि जय पवार हे सक्रिय राजकारणात नसले तरी पडद्यामागून पक्षसंघटनेमध्ये सक्रिय असल्याचं दिसतंय. असं असलं तरी या तिघांनाही राजकारणाचा तितकासा अनुभव नाही.
अजित पवारांच्या निधनानंतर एक उपमुख्यमंत्रिपद सध्या रिक्त आहे. पुढच्या सहा महिन्यात बारामती विधानसभा पोटनिवडणूकही घ्यावी लागणार आहे. त्यामुळे पक्षाचं नेतृत्व करायचं असेल तर सुनेत्रा पवारांनी बारामतीची पोटनिवडणूक लढवावी आणि उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावं अशी एक मागणी जोर धरताना दिसत आहे.


