तायगा शिंदे करणार महापालिकेच्या स्वच्छतेचा पोलखोल : शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग
अहिल्यानगर : महानगरपालिकेच्या स्वच्छता अभियानाची केवळ दिखाऊ मोहीम सुरू असून प्रत्यक्षात शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले आहेत. दररोज घरासमोर येणारी घंटागाडी ८ ते १० दिवस गायब राहते, त्यामुळे नागरिकांना घरातील कचरा साठवून ठेवावा लागतो किंवा नाईलाजाने रस्त्यावर टाकावा लागतो. परिणामी शहरभर दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक तायगा शिंदे यांनी पुढाकार घेत नागरिकांच्या समस्या थेट समजून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
ते म्हणाले की, मी प्रत्येक घरी जाऊन नागरिकांच्या तक्रारी ऐकणार असून कचऱ्याचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा पोलखोल करणार आहे. शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका महापालिकेने २ वर्षांपूर्वी दिला असला तरी प्रत्यक्षात ठरलेल्या अटींप्रमाणे काम होत नाही. घनकचरा संकलनात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असून महापालिका प्रशासन आणि ठेकेदार यांच्यात संगनमताने भ्रष्टाचार सुरू असल्याचा गंभीर आरोप शिंदे यांनी केला.
शहरातील कचरा उचलला जात नसतानाही केवळ कागदोपत्री वजन दाखवले जात आहे, असा दावा त्यांनी केला आहे. या अस्वच्छतेमुळे शहरात साथीचे आजार पसरण्याची शक्यता वाढली आहे. जर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून दररोज नियमित घंटागाडी चालू केली नाही, तर नागरिकांनी गोळा केलेला कचरा थेट महापालिकेच्या कार्यालयात आणून टाकण्याचा इशारा तायगा शिंदे यांनी दिला.


