दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरुन प्रचंड राजकारण रंगले आहे. 17 जानेवारीला शरद पवार आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत जयंत पाटील यांच्या घरी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासंदर्भात बैठक पार पडली होती, असा दावा सातत्याने शरद पवार गटाच्या नेत्यांकडून केला जात आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा फेटाळून लावला होता. दोन्ही राष्ट्रवादी विलीन होणार असत्या तर अजित पवार यांनी मला सांगितले असते, ते माझ्याशी सर्व गोष्टी शेअर करायचे, असा दावा फडणवीसांनी केला होता. या पार्श्वभूमीवर आता शरद पवार यांनी या सगळ्या चर्चेसंदर्भात ठोस भाष्य केले आहे.
शरद पवार यांनी प्रतिसवाल उपस्थित करताना म्हटले की, विलीनीकरणाच्या चर्चेत जे नव्हते त्यांना बैठकीबाबत काय माहिती असणार? मागील दोन दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरूच नव्हत्या, असे अजितदादा गटाच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देखील विलीनकरणाची चर्चा फेटाळताना अजित पवारांनी आपल्याशी अशी कोणतीही चर्चा केलीच नव्हती असा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे हे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा गटाच्या नेत्यांना खडसावणारे आहे. यावर आता भाजप आणि अजितदादा गटाचे नेते काय प्रत्युत्तर देणार, हे बघावे लागेल.
दरम्यान, शरद पवार हे मंगळवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन कामकाजात सहभागी होण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत.


