कर्जत : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोनवेळा मुख्यमंत्री होण्याची संधी असूनही ती मिळू शकली नाही, असा खळबळजनक दावा माजीमंत्री, राष्ट्रवादीचे तत्कालीन माजी प्रदेशाध्यक्ष बबनराव पाचपुते यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना तसेच राज्यात राष्ट्रवादी सत्तेत असताना बबनराव पाचपुते हे राष्ट्रवादीचे दीर्घकाळ मंत्री तसेच प्रदेशाध्यक्ष होते, त्यामुळेच त्यांच्या दाव्याने चर्चा होऊ लागली आहे.
कर्जत येथील विघ्नहर्ता नागरी सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना बबनराव पाचपुते यांनी हा दावा केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, अंबादास पिसाळ, नामदेव राऊत, प्रवीण घुले, बाळासाहेब शिंदे, विनोद दळवी, अनिल गदादे, काकासाहेब धांडे, पतसंस्था अध्यक्ष श्रुती विकास निंबाळकर यांच्यासह संचालक तसेच राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. पाचपुते यांनी सांगितले की, अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याची दोनवेळा स्पष्ट संधी होती आणि त्याचा सर्वात जवळचा साक्षीदार मी स्वतः आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असताना, पहिल्यावेळी पक्षाच्या ६२ आमदारांपैकी ५७ आमदारांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री करावे, अशी लेखी समर्थनपत्रे दिली होती. मात्र, पक्षातीलच काही नेत्यांनी विरोध केल्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी देण्यात आली नाही.दुसऱ्या वेळेस विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ७२ आमदार निवडून आले होते, तर काँग्रेस पक्षाचे ६९ आमदार होते. त्यामुळे मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे म्हणजे अजित पवार यांच्याकडे जाणार, अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांमध्येही याबाबत आनंदाचे वातावरण होते. मात्र, यावेळीही पक्षातीलच काही नेत्यांच्या विरोधामुळे अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची संधी हुकली, असेही पाचपुते यांनी स्पष्ट केले. त्यानंतर आम्ही अजित पवार यांना मुख्यमंत्री करावे म्हणून खूप आग्रह धरला म्हणून माझाही पत्ता कट करण्यात आला असे श्री. पाचपुते यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.
यावेळी बोलताना राजेंद्र फाळके म्हणाले, अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. जनतेच्या मनात असूनही न झालेले मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांची ओळख आता सर्वांना आहे. प्रस्ताविक काकासाहेब धांडे यांनी केले. आभार श्री निंबाळकर यांनी मानले.


