मालमत्ता करामधील सर्वसाधारण करामध्ये मे अखेरीपर्यंत १० टक्के सवलत
पाणीपट्टीत वाढ झाल्याने महानगरपालिकेकडून नवीन दरानुसार बिले वाटप सुरू
नागरिकांनी सवलतीचा लाभ घेऊन चालू वर्षाचा कर भरावा व दंड टाळावा : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे
अहिल्यानगर – नवीन आर्थिक वर्षात पाणीपट्टीच्या नवीन दरासह बिले वाटप सुरू करण्यात आले आहे. महानगरपालिका अधिनियमानुसार एप्रिल महिन्यात सर्वसाधारण करावर १० टक्के सवलत दिली जाते. यंदा नवीन दरामुळे बिले वाटप उशिराने सुरू झाले आहे. त्यामुळे सर्वसाधारण करावरील सवलतीचा लाभ सर्वांना मिळावा, यासाठी सवलतीची मुदत वाढवण्यात आली असून, १ मे ३१ मे या कालावधीत सर्वसाधारण करावरील १० टक्के सवलत कायम ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी याचा लाभ घेऊन वेळेत कराचा भरणा करावा व दंड टाळावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.
महानगरपालिकेच्या मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या वसुलीला मागील आर्थिक वर्षात नगरकरांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे विक्रमी वसुली झाली. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १४० अ नुसार करात एप्रिलमध्ये १०%, मे व जूनमध्ये ८% अशी सर्वसाधारण करात सूट दिली जाते. या वर्षात पाणीपट्टीच्या नवीन दरानुसार बिले वाटप करण्यासाठी काही प्रमाणात विलंब झाला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात दिली जाणारी १०% सवलत अनेकांना मिळू शकली नाही. नवीन दरानुसार बिलांचे वाटप महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आले आहे. नागरिकांना सवलतीचा लाभ मिळावा, यासाठी मे महिन्यातही १० टक्के सवलत सर्वसाधारण करावर दिली जाणार आहे. तसा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.
नागरिकांनी मे अखेरपर्यंत मालमत्ता कर व पाणीपट्टी भरून सर्वसाधारण करावरील १० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा. मागील वर्षात अनेकांनी वेळेत कर न भरल्याने त्यांना दंड भरावा लागला. त्यामुळे या आर्थिक वर्षात सवलतीचा लाभ घेऊन वेळेत मालमत्ता कर व पाणीपट्टी भरावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे. दरम्यान, काही अडचणींमुळे बिले न मिळाल्यास, नागरिकांनी त्यांच्या प्रभाग समिती कार्यालयात जाऊन बिल काढून घ्यावे व सवलतीचा लाभ घेऊन तत्काळ कराचा भरणा करावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.


