Saturday, November 1, 2025

अहिल्यानगरमध्ये बचत गटाच्या 20 महिलांच्या बँक खात्यातून साडेसात लाखांचा अपहार

राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील अ‍ॅक्सिस बँकेच्या शाखेत क्वेस कॉर्प लिमिटेडतर्फे नियुक्त केलेल्या एका कर्मचार्‍याने स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून बचत गटाच्या 29 महिला ग्राहकांच्या बँक खात्यातून एअरटेल पेमेंट बँकेच्या मदतीने 7 लाख 53 हजार 792 रुपयांचा अपहार केला आहे.याबाबत क्वेस कॉर्प लिमिटेडचे जनरल मॅनेजर श्रीधर मधुकर भोर, रा. डोंबिवली, मुंबई यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले, क्वेस कॉर्प लिमिटेड तर्फे भारतातील विविध क्षेत्रातील आस्थापनांना तंत्रज्ञान आणि व्यवसाय सेवांचा पुरवठा केला जातो. त्यापैकी अ‍ॅक्सिस बँक लिमिटेड आमचे ग्राहक आहे. राहुरी खुर्द येथील अ‍ॅक्सिस बँकेचे शाखाधिकारी कुंदन पाटील यांनी ई-मेलद्वारे कळविले की, क्वेस कॉर्प लिमिटेडचे किशोर संजय पोपळघट याची नोव्हेंबर 2024 मध्ये बँकेच्या शिर्डी शाखेत बदली केली. तेव्हा राहुरी शाखेच्या कलेक्शन ऑडिट मध्ये त्याने बँकेच्या ग्राहकांच्या कर्जाच्या रकमेचा गैरवापर केल्याचे उघडकीस आले आहे.

जुलै 2024 ते ऑक्टोबर 2024 दरम्यान आरोपी पोपळघट याने एअरटेल पेमेंट बँकेमध्ये स्वतःचा मोबाईल नंबर वापरून कर्जाचे अर्ज भरतो आहे, असे सांगून सर्वप्रथम बायोमॅट्रिक द्वारे ग्राहकांचे बचत खाते उघडले. खात्याचा नंबर आल्यावर अ‍ॅक्सिस बँकेच्या कर्जाची प्रक्रिया पूर्ण केली. ती कर्जाची रक्कम एअरटेल पेमेंट बँकेत वर्ग करून घेतली. त्यानंतर ओटीपीच्या माध्यमातून ग्राहकांच्या खात्यातून रोख स्वरूपात त्याचे ओळखीचे इसमाकडून (एअरटेल बँकेचा एजंट) पैसे काढून घेतले. एकुण 29 ग्राहकांचे बचत गटाच्या माध्यमातून त्यांची सर्व कागदपत्रांची पूर्तता करून व स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून एअरटेल पेमेंट बँकेच्या मदतीने 7 लाख, 53 हजार 792 रुपये रकमेचा अपहार करून त्यांची फसवणूक केली. त्यांचे सिबील खराब केले. त्यामुळे त्यांना इतर बँकेत कर्ज भेटत नाही, असेही फिर्यादीत म्हटले आहे.

श्रीधर मधुकर भोर, रा. डोंबिवली, मुंबई यांच्या फिर्यादीवरून आरोपी किशोर संजय पोपळघट, वय 31 वर्षे, रा. देवगाव रंगारी, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर याच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गु.र.न. 477/2025 भारतीय न्याय संहिता कलम 316(2), 318(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles