उत्तर प्रदेशातील गौतमबुद्ध नगर जिल्ह्यातील रबूपुरा गावात राहणाऱ्या पाकिस्तानी महिला सीमा हैदरवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. गुजरातमधून आलेल्या एका युवकाने हा हल्ला केल्याचं समोर आलं. तेजस झानी असं या युवकाचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. सीमा हैदरने आपल्यावर काळी जादू केल्याचा दावा या आरोपीने केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना 3 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास घडली. तेजस झानी नावाच्या युवकाने सीमा हैदर हिच्या घराच्या दरवाज्यावर लाथा मारत प्रवेश केला आणि आत गेल्यानंतर तिला काही समजण्या आधीच त्याने गळा दाबण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर सीमाने आरडाओरडा करताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली आणि आरोपी युवकाला पकडून मारहाण केली.
सीमा हैदर हिच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याचा मोबाईल जप्त केला असून त्याची चौकशी सुरू आहे. आरोपीचे मानसिक स्वास्थ्य स्थिर नसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.दरम्यान, आपण भारताची सून असून आपल्याला भारतातच राहू द्या अशी मागणी सीमा हैदरने केली आहे. एका व्हिडीओच्या माध्यमातून तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे ही मागणी केली आहे.
सीमा हैदर, मूळची पाकिस्तानची नागरिक असून 2023 मध्ये ती नेपाळमार्गे भारतात दाखल झाली होती. तिचा दावा आहे की, पबजी खेळताना तिची ओळख नोएडामधील सचिन याच्याशी झाली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. नंतर दोघांनी नेपाळमध्ये लग्न केल्याचे ती सांगते.
सीमा हैदरचे वकील ए. पी. सिंह यांनी यापूर्वी सांगितले होते की, तीने हिंदू धर्म स्वीकारला असून आता ती एक सनातनी महिला आहे. भारत सरकारने अलीकडे पाकिस्तानातून आलेल्या काही नागरिकांचे व्हिसा रद्द केल्यानंतर सीमाला पाकिस्तानमध्ये परत पाठवण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र वकिलांच्या मते, तिचे प्रकरण एटीएसकडे प्रलंबित असून सर्व कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत.


