कर्जत: रात्रीच्या चोऱ्या व घरफोड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सुरू असलेल्या गस्तीदरम्यान मिरजगाव पोलिस ठाण्याच्या सतर्कतेमुळे हरणाची शिकार करून दोन जिवंत हरणे पकडून घेऊन जाणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला. या कारवाईत दोन हरणांचे प्राण वाचले, मात्र एका हरणाचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली. या प्रकरणी वन विभागाने एका महिलेसह पाच जणांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिरजगाव पोलिस स्टेशन हद्दीत मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी चोऱ्या व घरफोड्यांचे प्रमाण वाढले होते. त्या पार्श्वभूमीवर प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक विजय झंजाड यांनी स्वतंत्र गस्त पथक नेमले होते. दि. 3 मार्च 2026 रोजी पहाटे सुमारे चारच्या सुमारास चांदेबिटकेवाडी जंगल परिसरात गस्त घालत असताना दोन दुचाकींवरून जाणारे चार पुरुष व एक महिला संशयास्पदरीत्या आढळून आले.
पोलिसांनी त्यांचा पाठलाग करताच एका दुचाकीवरील दोन संशयितांनी गाठोडे व दुचाकी घटनास्थळीच टाकून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. दुसऱ्या दुचाकीवरील संशयित दुचाकीसह फरार झाले. घटनास्थळी सापडलेल्या गाठोड्यांची तपासणी केली असता, त्यात शिकार करून ठार मारलेले एक हरीण व पाय-तोंड बांधलेल्या अवस्थेत दोन जिवंत हरणे आढळून आली. यापैकी एका जिवंत हरणास तत्काळ नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
या घटनेची माहिती तत्काळ वन विभाग, मिरजगाव यांना देण्यात आली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी संकेत उगले यांच्यासह वनरक्षक सागर वाकचौरे, आजिनाथ ननावरे, हरिभाऊ बारगजे व दिनकर लिलके यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जप्त केलेली दुचाकी, हरीण पकडण्यासाठी वापरण्यात आलेली जाळी, दोरी, शाल, मोबाईल हँडसेट, तसेच एक जिवंत व एक मृत हरीण असा सर्व मुद्देमाल वन विभागाच्या ताब्यात देण्यात आला. वन विभागाने पंचनामा करून चार पुरुष व एका महिलेला संशयित आरोपी म्हणून निष्पन्न केले असून, वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही संयुक्त कारवाई प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक विजय झंजाड यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजगावचे पोलिस कॉन्स्टेबल सुनील खैरे, गोकुळ पळसे, राजेंद्र गाडे तसेच वन विभागाच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. पोलिसांच्या या तत्परतेमुळे वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची कामगिरी घडली असून, परिसरातील नागरिकांकडून या कारवाईचे विशेष कौतुक होत आहे.


