Saturday, November 1, 2025

राज्यात पशुसंवर्धनच्या योजनांचा लाभ आता अ‍ॅपमधून, शेतकर्‍यांना विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागणार

अहिल्यानगर-राज्यातील शेतकर्‍यांना पशुसंवर्धन विभागाच्यावतीने राबविण्यात येणार्‍या विविध योजना आता अ‍ॅपच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत. यासाठी शेतकर्‍यांना संबंधित योजनांचे अर्ज अथवा विविध माहिती ऑनलाईन मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातूनच भरावी लागणार आहे. तसेच लाभार्थी निवडीची प्रक्रिया ऑनलाईन होणार असल्याने पशुसंवर्धन विभागाच्या योजना राबवताना आणखी पारदर्शकता येणार आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग व राज्य सरकार पशुसंवर्धन विभाग यांच्यावतीने दरवर्षी सुमारे तीन ते साडेतीन कोटी रुपयांच्या योजना राबविण्यात येतात.राज्याच्या ग्रामीण भागात सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना ‘स्व’ रोजगाराचे साधन उपलब्ध करून देत, त्यांना शाश्वत अर्थाजर्नाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. यात गाय गट, शेळी गट, नाविन्यपूर्ण योजना, यासह कुक्कुट पालनाच्या विविध योजनांचा समावेश आहे. चालू वर्षीपासून या योजना राबवण्यासाठी शेतकर्‍यांना ऑनलाईन प्रणालीचा वापर करावा लागणार आहे. यासाठी मोबाईलवर अ‍ॅप डाऊनलोड करून त्यातून योजनांचे अर्ज व विविध दाखले सादर करावे लागणार आहेत. दाखल होणार्‍या या अर्जाची ऑनलाईन पडताळणी होऊन आधी तालुका पातळी, त्यानंतर जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग व त्यानंतर अंतिम निर्णय यांच्या पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या कार्यालयाच्यावतीने करण्यात येणार आहे.

यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने ऑनलाईन प्रणालीचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात 3 मे ते 2 जून या कालावधीत संबंधित शेतकर्याला ऑनलाइन अर्ज करता येणार असून त्यानंतर 3 ते 7 जून या कालावधीत दाखल अर्जाची रँडमाइजेशन पद्धतीने लाभार्थ्यांची प्राथमिक निवड करण्यात येणार आहे. 8 ते 15 जून या कालावधीत लाभार्थ्यांना संबंधित योजनेसाठी कागदपत्रे अपलोड करण्यासाठी वेळ देण्यात आलेला आहे. त्यानंतर 16 ते 24 जून या कालावधीत पशुधन विकास अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुधन उपायुक्त यांच्यामार्फत लाभार्थी निवड करण्यात येणार आहे.

25 ते 27 जून या कालावधीत लाभार्थी यांच्या कागदपत्रातील त्रुटी पूर्तता करून 28 ते 30 जून या दरम्यान कागदपत्रांची अंतिम पडताळणी करून 2 जुलै रोजी अंतिम लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात येणार आहे. या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करत्या वेळेपासून लाभार्थी निवडीची प्रक्रिया ही 60 दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे. या ऑनलाईन पध्दतीमुळे आता पशूसंवर्धन विभागाच्या योजना राबवतांना कमी कालावधीत राबवता येणार आहे.


नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी पशुसंवर्धन विभागाकडील विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अ‍ॅप डाऊनलोड करून त्याद्वारे विहित कालावधीत अर्ज करून ऑनलाईन कागदपत्रे सादर करावीत. पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
– डॉ. सुनील तुंबारे, उपायुक्त जिल्हा पशुसंवर्धन विभाग.

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles