रूपाली चाकणकरांची प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करा; राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकार्‍यांचे सुनेत्रा पवारांना पत्र

महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातसोबत फोटो समोर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या (अजित पवार) महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरयांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यामुळे राष्ट्रवादीची प्रतिमा देखील मलीन झाली होती. तसेच पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी वरिष्ठाकडे केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

अशातच आता राष्ट्रवादीच्या नाशिक महिला जिल्हाध्यक्ष तथा भगूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. “महिलांचा छळ करणाऱ्यांचे समर्थन करणाऱ्या नेतृत्वाखाली आम्ही काम करू शकत नाही,” असे बलकवडे यांनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, नाशिकमधून सुरू झालेले राष्ट्रवादीतील हे बंड आता राज्यस्तरावर काय वळण घेते आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याबाबत काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. महिला आघाडीतील हा अंतर्गत कलह पक्षाला महागात पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना पाठवलेल्या पत्रात नाशिकच्या महिला पदाधिकार्‍यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यात म्हटले की, “एकीकडे पक्ष महिलांच्या सन्मानाची भाषा करतो आणि दुसरीकडे प्रदेशाध्यक्षा छळ करणाऱ्यांचे समर्थन करतात, हे लज्जास्पद आहे. डॉ. अशोक खरात या व्यक्तीकडून अनेक महिला आणि तरुण मुलींचा छळ करण्यात आला असून, रूपाली चाकणकरांचा थेट संपर्क असल्याचा दावा या पत्रात करण्यात आला आहे. तसेच या पत्रात केवळ खरात प्रकरणाचाच उल्लेख नाही, तर यापूर्वीचे हगवणे प्रकरण आणि संपदा मुंडे प्रकरणानंतर आता खरात प्रकरणामुळे पक्षाला प्रचंड ट्रोल केले जात आहे. महिला संघटनेत चाकणकर यांनी दोन गट पाडले आहेत. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महिलांना त्या पदावरून काढून टाकत होत्या. संघटनेत खंबीर उभ्या राहणार्‍या नेतृत्वाची गरज आहे. गटबाजी करणाऱ्यांची नाही, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles