पाणी योजना यशस्वी पद्धतीने चालविण्याचे दिले धडे; संदेश कार्ले यांचे अधिकार्‍यांना मार्गदर्शन

अहिल्यानगर :पाणी योजना कशा पद्धतीने चालविली पाहिजे, त्यात येणारे अडथळे, बारकावे, पाणी गळती कशी थांबवावी, लोकांचा सहभाग कसा घ्यायचा, पाणी योजनेचे वीज बिल कमी करण्यासाठी काय केले पाहिजे, पाणी योजना चालवितांना अधिकारी पदाधिकार्‍यांनी समन्वयाची भूमिका ठेवणे किती महत्वाचे आहे. गटविकास अधिकारी यांनी योजना राबवितांना कोणती भूमिका घेतली पाहिजे, कोणती काळजी घेतली पाहिजे, जनतेच्या मनातील संभ्रम दूर करून पाणी योजनेच्या भविष्यासाठी कठोर भूमिका कशा पद्धतीने ठेवली पाहिजे याबद्दल जिल्हा परिषद सदस्य, माजी सभापती, घोसपुरी पाणी योजनेचे माजी अध्यक्ष संदेश कार्ले यांनी गटविकास अधिकार्‍यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
पुणे येथील यशदा च्यावतीने आयोजित विशेष ऑनलाइन सत्रात मंगळवारी (दि.२४) अहिल्यानगर जिल्हा परिषदचे माजी सदस्य तथा नगर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती संदेश कार्ले यांनी आपल्या राजकीय आणि प्रशासकीय अनुभवांची सविस्तर मांडणी केली. यशदाच्या रेश्मा होजगे यांच्या विशेष निमंत्रणावरून हे सत्र आयोजित करण्यात आले होते.
या सत्रामध्ये राज्यभरातील सुमारे २८५ गटविकास अधिकारी व सहाय्यक गटविकास अधिकार्‍यांनी ऑनलाइन सहभाग घेतला. पाणीपुरवठा योजना, अधिकारी-पदाधिकारी संबंध आणि गटविकास अधिकार्‍यांची योजना राबवताना भूमिका या तीन महत्त्वपूर्ण विषयांवर संदेश कार्ले यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्ले यांनी विशेषतः घोसपुरी पाणीपुरवठा योजनेचा अनुभव सांगताना योजना राबविताना आलेल्या अडचणी, त्यावर शोधलेले उपाय, तसेच टँकरद्वारे केलेल्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना मिळालेले समाधान यांचा उल्लेख केला. याशिवाय, पंचायत समितीच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात राबवलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेत, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय किती महत्त्वाचा आहे हे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यकाळात एकत्र काम केलेल्या अधिकार्‍यांच्या आठवणींना उजाळा देताना, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिरसागर, शैलेश नवल तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी संजीव कुमार, अनिल कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकाभिमुख कामे कशी प्रभावीपणे राबवता आली, याचा अनुभवही त्यांनी मांडला. गावातील सरपंच आणि ग्रामस्थ यांचा मोठा सहभाग लाभला.
गटविकास अधिकारी यांच्याशी ऑनलाईन संवादातून अधिकार्‍यांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रिया आणि सहकार्याच्या भावना यामुळे आपल्या कामाचा खरा ठेवा काय आहे, याची जाणीव झाली, असे कार्ले यांनी सांगितले. मी समोर नसतानाही अधिकारी एकत्र येऊन चांगल्या कामांची चर्चा करताना माझे नाव घेतात, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी कमाई आहे, असे ते म्हणाले. सुस्थितीत असलेल्या पाणी योजनेत राजकारण शिरल्यास योजनेला अशा पद्धतीने दृष्ट लागते हे घोसपुरी पाणी पुरवठा योजनेचे सध्याचे उदाहरण देवून सांगितले.
सत्राच्या शेवटी त्यांनी यशदाचे आभार मानत, अधिकार्‍यांना मार्गदर्शन करण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.


माणसांबरोबर जनावरांचेही आरोग्य सुधारले…
घोसपुरी पाणी योजना चालविताना योजनेतील खंडाळा गावातील प्रत्येक घरासमोरील नळाला मीटर बसविले. सुरुवातीला ग्रामपंचायतला ४९ हजार रुपयांची वसुली होत होती ती आता सहा लाखांच्या पुढे आहे. मीटरद्वारे पाणी पुरवठा होत असल्याने घरात दोन माणसे असणार्‍यांना कमी पाणी पट्टी आणि घरात १० ते १५ माणसे असणार्‍यांना दीड ते दोन हजार रुपये पाणी पट्टी यायला लागली. नागरिकांना शुद्ध पाणी मिळाल्याने नागरिकांनी वेळच्यावेळी भरली. शुद्ध पाण्यामुळे माणसांचे आरोग्य सुधारलेच. परंतु, तेच पाणी जनावरांना दिल्यामुळे जनावरांचेही आरोग्य सुधारले असे संदेश कार्ले यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles