नगर -तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावांत दोन महिलांचा विनयभंग केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही प्रकरणांत स्वतंत्र फिर्यादी दाखल झाल्या असून अहिल्यानगर तालुका व भिंगार कॅम्प पोलिसांनी संबंधित संशयित आरोपींविरूध्द गुन्हे नोंदविले आहेत. पहिली घटना भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत घडली. 22 वर्षीय विवाहित महिला घरात एकटी असताना दादा भाऊसाहेब बोराडे (रा. बोरूडी, ता. आष्टी, जि. बीड) हा अनधिकृतपणे घरात शिरला. तू मला आवडतेस, तु तुझ्या नवर्याकडे राहत नाही, आपण लग्न करू, असे म्हणत त्याने पीडितेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
सदरची घटना 4 मार्च रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास घडली असून पीडिताने 23 मार्च रोजी रात्री भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी दादा भाऊसाहेब बोराडे विरोधात गुन्हा नोंद केला आहे. दुसरी घटना अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. येथे एका विवाहित महिलेचा (वय 38) शेतात काम करत असताना विनयभंग करण्यात आला. सोमेश उर्फ बाल्या सुभाष कारले (रा. साकत, ता. अहिल्यानगर) हा गेल्या काही दिवसांपासून पीडितेचा पाठलाग करून अश्लिल इशारे करत होता. रविवारी (22 मार्च) दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास त्याने मागून येत पीडितेला मिठी मारली.
पीडितेने विरोध करताच त्याने काठीने मारहाण केला आणि तिला जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पीडितेच्या कुटुंबीयांनी मदतीला धाव घेतल्यावर सोमेश याने त्यांनाही जीवे मारण्याची धमकी देत तेथून पळ काढला. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सोमेश ऊर्फ बाल्या सुभाष कारले विरोधात गुन्हा नोंद केला आहे.


