मनपा कामगारांचे कामबंद आंदोलन; पगार रखडल्याने प्रशासनाविरोधात संताप
फेब्रुवारी-मार्चचा पगार न मिळाल्याने कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
बजेट महासभेवरही प्रश्नचिन्ह; ठोस आश्वासनाशिवाय काम सुरू करणार नाही – युनियन
कर्जाचे हप्ते, शाळेच्या फीचा ताण; आर्थिक अडचणीत सापडले कर्मचारी
अहिल्यानगर (प्रतिनिधी) : अहिल्यानगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी व मार्च महिना संपत आला तरी पगार न झाल्यामुळे कर्मचारी संतप्त झाले असून महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. प्रशासकीय इमारतीमध्ये कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
पगार रखडल्यामुळे कर्मचाऱ्यांवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे. कर्जाचे हप्ते, मुलांच्या शाळेची फी, तसेच आजारपणाचे खर्च भागवणे कठीण झाले असून अनेक कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, आज महापौर ज्योतीताई गाडे यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेची बजेट महासभा होणार असून, कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे या सभेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
यावेळी कामगार युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल म्हणाले की, फेब्रुवारी महिना संपून मार्चही संपत आला तरी कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. त्यामुळे कर्मचारी अत्यंत कठीण परिस्थितीत आहेत.
ते पुढे म्हणाले की, जोपर्यंत प्रशासनाकडून पगाराबाबत ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत कर्मचारी कामकाज सुरू करणार नाहीत. प्रशासनाने तात्काळ यावर तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
महानगरपालिगकेतील पगारप्रश्न गंभीर बनला असून, यामुळे प्रशासन व कर्मचाऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रश्नावर तातडीने तोडगा निघणे गरजेचे असल्याची भावना कर्मचारी व्यक्त करीत आहे.


