राहुरीचे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. याठिकाणी भाजपने त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देऊ केली आहे. त्यांच्याविरोधात माजी राज्यमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे हे रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र, त्यापूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतली आहे.
रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील सोमवारी सकाळी अचानक प्राजक्त तनपुरे यांच्या भेटीसाठी पोहोचले. या तिन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी प्राजक्त तनपुरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन दिल्याचे समजते. त्यामुळे आता प्राजक्त तनपुरे निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतील, अशी चर्चा रंगू लागली आहे. आता प्राजक्त तनपुरे राहुरी पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार की नाही, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्र्यांनी मला विनंती केली आहे. विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन दिले आहे. याबाबत मला कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागेल. माझा उमेदवारी अर्ज भरुन तयार आहे. ज्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवायचं म्हणतोय, तो मुद्दाच सोडवण्याची तयारी त्यांनी दाखवली असेल तर मला माझ्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन मला निर्णय घ्यावा लागेल, अशी प्रतिक्रिया प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केली. त्यांचा एकूण सूर पाहता ते या पोटनिवडणुकीतून माघार घेतील, असे दिसत आहे.
प्राजक्त तनपुरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रात एखाद्या लोकप्रतिनिधीचे निधन झाल्यानंतर त्याच्या घरातील कोणी निवडणुकीला सामोरे जात असेल तर ती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा आहे. प्राजक्त तनपुरे, देवेंद्र फडणवीस, मी आम्ही सगळ्यांनी विधानसभेत एकत्र काम केले आहे. ते गेल्यावेळी राज्यात मंत्री म्हणून कार्यरत होते. राहुरी मतदारसंघातील विकासाचे विषय आणि समस्या एकत्रितपणे सोडवता येऊ शकतात. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांनी पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी, अशी विनंती आम्ही त्यांना केली. ते आता त्याच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेतील, असे रवींद्र चव्हाण यांनी म्हटले.
राहुरी मतदारसंघात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे, एमआयडीसी निर्माण होणे गरजेचे आहे. येथील धरणातील गाळ काढण्याची गरज आहे. प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी मतदारसंघातील समस्या कळकळीने मांडल्या. आम्ही यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे फोनवरुन बोलणे करुन दिले. आम्ही सर्वजण प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत आहोत. ते जो म्हणतील त्या सगळ्या विकास कामाचा विचार केला जाईल, महायुती सरकार त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक राहील. प्राजक्त तनपुरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या या भागातील वलयाची आम्हाला कल्पना आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. आम्ही उमेदवारी मागे घ्यायची की नाही, हा निर्णय त्यांच्यावर सोडला आहे, असे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.


