महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज (सोमवारी) बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा बारामतीमध्ये मेळावा पार पडला. या मेळाव्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जय पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी बारामतीमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात बोलतांना सुनेत्रा पवार म्हणाल्या की,” दोन महिन्यापूर्वी आपण सर्वांनी आपल्या लाडक्या नेत्याला गमावलं. आज त्या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. बारामतीत ही पोटनिवडणूक होईल. दादा अजूनही आपल्यात नाहीत असं मला वाटतं नाही. दादाचं जाणं ही फक्त माझी, माझ्या कुटुंबाची व्यक्तीगत हानी नाही, तर बारामती, देश, महाराष्ट्राची हानी झाली असं म्हटल्यास वावग ठरणार नाही. बारामती दादांसाठी आईसारखी होती. बारामतीचा प्रत्येक नागरिक दादांसाठी खरा पांडुरंग होता. बारामतीकरांची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा हाच दादाचा विश्वास, आधार होता. बारामती म्हणजे दादांचा श्वास होता. म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वास बारामतीच्या मातीत विसावला” असे त्यांनी म्हटले.
पुढे त्या म्हणाल्या,” बारामतीचा विकास कायम सुरू राहील. प्रशासनावर दरारा राहील, बारामतीची ओळख तशीच राहील. गुंडागर्दी आणि खंडणीला थारा मिळणार नाही. आता विकास थांबणार नाही याची खात्री बाळगा. महायुतीचा भक्कम पाठिंबा आपल्याला आहे. अजितदादांच्या विचाराचा वारसा सांभाळात मी काम करीत राहील. चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून आणि सहा वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांची पत्नी म्हणून मला राज्य सांभाळायची ताकद मिळेल. बारामती जागतिक दर्जाचं शहर बनण्याचं स्वप्न पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर असताना नियतीने दादांना आपल्यातून नेलं. त्यांना लोक कल्याणाची खरी तळमळ होते. जो पर्यंत जिवंत आहे, तो पर्यंत बारामतीकरांची सेवा करत राहीन हे दादांनी आपले शब्द खरे करुन दाखवले. अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही. पण त्यांचा विचार पुढे घेऊन जाईल”, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले.
यावेळी सुनेत्रा पवार म्हणाल्या की, बारामतीमधील प्रत्येक झाडात, पानात, फुलात, रस्त्याला, शाळेत, नदी, इमारतीत दादांचा स्पर्श आहे. पानं, फुलं आज दादांच्या आठवणीने रडत आहेत. बारामतीकरांच्या विकासासाठी दादाचे स्वप्न साकार करण्यासाठी मी माझं दु:ख तळ घरात कोंडलं. अत्यंत धीराने आपल्या सर्वांसाठी बाहेर पडले. मात्र मला हा धीर तुम्हा बारमतीकरांकडे बघून आला आहे.तुमचं प्रेम, पाठिंबा, तुमची साथ हीच माझी शक्ती आहे. जय पवार आणि पार्थ पवार हे माझं कुटुंब नाही. तुम्ही सगळे माझं कुटुंब आहात. एकालाही वाऱ्यावर सोडणार नाही. अजितदादांचा जनता दरबार सुरू राहील. बारामतीचा विकास कायम सुरू राहील, अशी ग्वाही देखील सुनेत्रा पवारांनी दिली.


