राज्यातील दोन मतदारसंघात विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत असून बारामती विधानसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न करण्यात आले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या येथील जागेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, महाविकास आघाडीकडून काँग्रेसने आकाश मोरे यांना मैदानात उतरवलं आहे. काँग्रेसने धनगर समाजाचा चेहरा बारामतीच्या निवडणूक रिंगणात उतवला असून सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्यास, निवडणूक बिनविरोध करण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे, महायुतीच्या नेत्यांकडून काँग्रेसच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली जात आहे. तर, पार्थ पवार यांनी चक्क काँग्रेसला इशाराच दिला आहे.
माझं कुणाशी बोलणं झालं नाही. काँग्रेसला (त्यांना) कळायला पाहिजे काय करायचं ते. त्यांच्या (काँग्रेसच्या) राष्ट्रीय नेतृत्वाबाबत मला नाही माहिती. सगळे मोठे लोक आहेत, सर्वांना माहिती आहे काय चाललंय. त्यांनी (काँग्रेसने) विचार केला असेल तर करु द्या. पण त्यांना (काँग्रेसला) नंतर काय त्रास होईल महाराष्ट्रात, हे त्यांना दिसेल, अशा शब्दात पार्थ पवार यांनी काँग्रेसच्या उमेदवारीबाबत थेट इशाराच दिलाय.
लोक विसरत नाहीत. जे दादांचं प्रेम आहे लोकांच्या मनात, अशावेळी एवढ्या मॅच्युअर पार्टीने हा निर्णय घेणे, जिथे एवढे मोठे नेते आहेत, अतिशय चुकीचं आहे. मला वाटतं की आपण कोणाला थांबवू शकत नाही. जशी वेळ येते तसं सामोरं जावं लागतं. आम्ही सामोरं जाऊ, आम्ही काही कुणाला फोन करणार नाही, जे काही नशिबात लिहिलं आहे, ते बघू काय व्हायचंय ते. फक्त मला वाईट वाटतंय की काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल आहे, असेही पार्थ पवार यांनी म्हटलं.


