Tuesday, November 4, 2025

एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी उडवली पाकिस्तानची खिल्ली; म्हणाले……

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडे हात पसरले असून १ अब्ज डॉलर्सचे कर्ज मागितले आहे. हे कर्ज मंजूर होणार असल्यामुळे एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, पाकिस्तान हे एक भिकारी राष्ट्र आहे. आयएमफ पाकिस्तानला कर्ज देऊन मोठी चूक करत आहे. अमेरिका, जर्मनी आणि जपानने या कर्जासाठी कशी मंजूरी दिली? हाच मोठा प्रश्न आहे. पाकिस्तानला साधी त्यांची अर्थव्यवस्था सांभाळता येत नाही. हिंदू-मुस्लिमांमध्ये फक्त संघर्ष व्हावा, एवढाच पाकिस्तानचा प्रयत्न असतो, अशी टीका त्यांनी केली.

हैदराबाद येथील एका कार्यक्रमात बोलत असताना ओवेसी यांनी पाकिस्तानवर टीका केली. तसेच एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्येही त्यांनी पाकिस्तानला सुनावले. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीतही असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारच्या कारवाईला आपला पाठिंबा दर्शिवला होता. तसेच पाकिस्तानला धडा शिकविण्याची मागणी त्यांनी केली होती.ओवेसी म्हणाले, पाकिस्तान सोयीस्करपणे विसरतो की, भारतात २३ कोटींहून अधिक मुस्लीम राहतात. आमच्या पूर्वजांनी दोन देशांचा सिद्धांत नाकारला होता. जिन्नांनी मांडलेल्या द्विराष्ट्र सिद्धांताचा आम्ही विरोध करतो तसेच हा सिद्धांत नाकारतो. आम्ही भारताला आमचा देश म्हणून स्वीकारले आहे आणि आम्ही इथेच राहू.

ओवेसी पुढे म्हणाले, “पाकिस्तान भारताला धर्माच्या आधारावर विभागू पाहत आहे. त्यामुळेच हिंदू आणि मुस्लीम तसेच इतर धर्मीयात वाद कसे निर्माण होतील, याचा ते प्रयत्न करतात. पाकिस्तान द्वीराष्ट्राच्या सिद्धांताबद्दल बोलतो मग पाकिस्तानकडून अफगाणिस्तानच्या सीमेवर बॉम्बस्फोट का सुरू आहेत. इराणी सीमेवरही त्यांच्याकडून बॉम्ब फेकण्यात येत आहेत. बलुचमधील लोकांवर ते अन्याय का करत आहेत? अफगाणी, इराणी आणि बलुची हे सर्व मुस्लीमच आहेत. पण पाकिस्तान फक्त बेकायदेशीर काम आणि दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी इस्लामचा वापर करत आला आहे. मागच्या ७५ वर्षांपासून ते भारताविरोधात हेच करत आहेत.”पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मोठ्या प्रमाणात कर्ज मिळाले आहे. याबद्दल बोलताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, ओसामा बिन लादेनने पाकिस्तानच्या लष्करी परिसरात आसरा घेतला होता. पाकिस्तानच्या लष्कराकडून त्याला मदत पुरविली जात होती. पाश्चात्य देशांनी हे समजून घ्यायला हवे की, पाकिस्तान एक अपयशी राष्ट्र आहे. फक्त पाश्चात्य देशांनीच नाही तर जगातील इतर देशांनीही एकत्र येऊन पाकिस्तानकडे असलेले अण्वस्त्र काढून घेतले पाहिजेत. पाकिस्तानकडील अण्वस्त्र संपूर्ण मानवजातीसाठी धोका आहे, अशीही टीका ओवेसी यांनी केली.

दहशतवादाचा वापर करून भारतात अशांतता निर्माण करण्याचे काम पाकिस्तानकडून केले जाते. मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यात लष्कर-ए-तैय्यबाचा हात असल्याचा पुरावा भारताने दिला होता. आयएसआयकडून अतिरेक्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याचेही भारताने पुराव्यानिशी सांगितले होते. पण पाकिस्तानने त्यावर काहीच केले नाही, असेही ते म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles