स्टेशन रोड, सोलापूर महामार्ग, कानडे मळा परिसराला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामातील अडथळे दूर
जागा मालक, स्थानिक नागरिक, अतिक्रमणधारकांशी चर्चेतून निघाला मार्ग
दोन महिन्यात रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे
अहिल्यानगर – स्टेशन रोड व सोलापूर महामार्गाला जोडणाऱ्या, तसेच सोलापूर महामार्ग ते कानडे मळामार्गे सारसनगरला जोडणाऱ्या हॉटेल फरहत ते महावितरण ते भिंगार नाला रस्त्याच्या मार्गातील अडथळे दूर झाले आहेत. या रस्त्यात बाधित होणाऱ्या जागा मालकांशी, नागरिकांशी चर्चा करून मार्ग काढण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच या रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण होऊन, रस्ता नागरिकांसाठी खुला होईल, असा विश्वास आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी व्यक्त केला.
सोलापूर महामार्ग ते कानडे मळा रस्त्यासाठी व या मार्गाला जोडणाऱ्या हॉटेल फरहत ते भिंगारनाला रस्त्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. हॉटेल फरहतपासून भिंगार नाल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही ट्रस्ट व नागरिकांच्या जागा बाधित होत आहेत. काहींची अतिक्रमणे आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम रखडले होते. या संदर्भात तेथील जागा व अतिक्रमणधारकांशी चर्चा करून मार्ग काढण्यात आला आहे. तेथील नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेण्याची तयारी दर्शवली आहे. इतर ठिकाणी भूमिअभिलेख विभागाने रस्त्याची मोजणी करून देत जागा निश्चित करून दिली आहे. तेथील शेतकऱ्यांनीही या रस्त्याच्या कामासाठी सहकार्य केले आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामातील अडथळे दूर झाले असून, येत्या दोन महिन्यात काम पूर्ण करण्याचे आदेश ठेकेदाराला देण्यात आल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.
दरम्यान, या रस्त्याचे काम झाल्यावर सोलापूर महामार्ग ते कानडे मळा रस्त्याला जोडणारा लिंक रस्ता तयार होणार आहे. कानडे मळा, सारसनगरकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध वाहतूक या मार्गाने सुरू होणार आहे. तसेच, या रस्त्यामुळे स्टेशन रोड व सोलापूर महामार्ग जोडला जाणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले.


