अहिल्यानगर –जिल्ह्यातील मराठा समाजातील तरुणांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी राहुल बाळासाहेब चोळके आणि गौरव शंकर मंचरे यांच्यावर नगरमध्ये गुन्हे दाखल आहेत. मात्र, पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाचा हवा तसा पाठपुरावा होत नसल्याचा आरोप अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला. तसेच मराठा समाजाची फसवणूक करणार्या आरोपींना कठोर शिक्षा होणे आवश्यक असून या गुन्ह्याचा पाठपुरावा करण्यासाठी समाजातील विविध संघटनांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आरोपींना पोलीस कोठडी मंजूर होऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.
6 एप्रिल रोजी शिर्डी येथे शिर्डी व परिसरातील तालुक्यामधील लाभार्थ्यांचा आढावा घेऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. त्यानंतर 7 एप्रिल रोजी नगर येथील कौशल्य विकास विभागाच्या कार्यालयात उपस्थित राहून त्यांनी जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी महामंडळाच्या कामाचा तपशील देताना पाटील यांनी सांगितले की, महामंडळामुळे 1.80 लाख उद्योजक तयार झालेले असून 1 हजार 634 रूपये कोटीपेक्षा अधिक रक्कमेचा व्याज परतावा महामंडळाने लाभार्थ्यांना केला दिला आहे. अहिल्यानगर जिल्हा महामंडळाचे 20 हजार 961 लाभार्थी असून बँकेमार्फत 1 हजार 647 कोटी कर्ज वितरित करण्यात आलेले असून 163 कोटींपेक्षा अधिक व्याज परतावा हा नगर जिल्ह्यातील लाभार्थीच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. महामंडळाच्या योजनांमध्ये लाभार्थी हिताचे निर्णय घेण्याऐवजी जाचक अटी लादल्या असल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी यावेळी केला. यावेळी इतर महामंडळांमध्ये उत्पन्नाची मर्यादा ही जास्तीत जास्त किती असावी, यासह अन्य मागण्या केल्या.


