मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना १५०० रूपयांची आर्थिक मदत केली जाते. पण ईकेवायसीनंतर नेमकी प्रक्रिया काय असेल? कुणाचा लाभ बंद होणार? कधीपासून बंद होणार? यासारखे प्रश्न राज्यातील लाडक्या बहिणींना सतावत आहेत. तसेच ईकेवायसी का केली? असाही प्रश्न उपस्थित झालाय. याचं उत्तर महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहे. रायगडमध्ये बोलताना आदिती तटकरे यांनी ईकेवायसी आणि पात्र लाडक्या बहिणींवर मोठं वक्तव्य केले आहे.
ईकेवायसीच्या प्रक्रियेची सुरूवात २०२५ सप्टेंबरपासून झाली. नोव्हेंबरपर्यंत पहिली मुदत देण्यात आली होती. त्यामध्ये ३१ डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर ३१ मार्च आणि आता ३० एप्रिलपर्यंत ईकेवायसी दुरूस्तीसाठी मुदतवाढ देण्यात आली. अनेक महिलांनी ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अथवा करत असताना अडचणी येत होत्या, त्यांनी आमच्याकडे सूचना आणि तक्रार दिल्या होत्या, त्यानुसार मुदतवाढ दिली. महिला लाभार्थी दिलेल्या मुदतीत दुरूस्ती करून सबमीट करत आहेत. ३० एप्रिलपर्यंत सर्व डेटा समोर येईल. राज्य सरकारच्या अथवा केंद्र सरकारच्या प्रत्येक योजनेसाठी सर्वांना ईकेवायसीची अनिवार्य आहे. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू आहे. ईकेवायसीनंतर योजनेचा लाभ सुरू राहील, असे आदिती तटकरे म्हणाल्या.
सप्टेंबर ते डिसेंबर २०२५ , या काळात राज्यातील महिलांनी लाडकी बहीण योजसेनासाठी ईकेवायसी केली. पण ही प्रक्रिया करताना अनेकांच्या चूका झाल्या. काही प्रश्नांची उत्तरे चुकली. त्यामुळे राज्य सरकारकडून ईकेवायसीसाठी मुदतवाढ देण्यात आली. मार्च अखेरपर्यंत ईकेवायसीची मुदत होती. पण अवकाळी पावसामुळे अनेक महिलांना प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. त्यामुळे आता एप्रिल अखेपर्यंत ईकेवायसी दुरूस्तीची मुदतवाढ देण्यात आली आहे.


