अहिल्यानगर-आगडगाव (ता. अहिल्यानगर) येथील काळभैरवनाथ मंदिरातील यात्रेनिमित्त दर्शनासाठी गेलेल्या महिलेला तिघांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी (11 एप्रिल) रात्री 10:30 वाजताच्या सुमारास घडली. हिराबाई तुळसीदास बोरूडे (वय 39, मुळ रा. आगडगाव, ता. अहिल्यानगर, हल्ली रा. कानडे मळा, सारसनगर, अहिल्यानगर) असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे.
न्यायालयात चालू असलेली केस मागे घेण्यासाठी ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, यासंदर्भात हिराबाई बोरूडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश देवराम साळुंके, सागर देवराम साळुंके आणि अमोल कारभारी कराळे (सर्व रा. आगडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आगडगाव येथील काळभैरवनाथ मंदिर परिसरात देवदर्शनासाठी गेल्या होत्या. यावेळी संशयित आरोपींनी फिर्यादीला गाठले. कोर्टात चालू असलेली केस मागे घ्या, असे म्हणत शिवीगाळ केली. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले आणि सागर साळुंके याने त्याच्या हातातील लाकडी काठीने फिर्यादीला मारहाण केली.
तसेच अन्य संशयित आरोपींनी फिर्यादीला मारहाण करून ‘जर केस मागे घेतली नाही, तर तुम्हाला जिवे ठार मारून टाकू’, अशी धमकी दिली. या प्रकारानंतर घाबरलेल्या महिलेने तत्काळ अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी तिघांविरूध्द गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार भवार करीत आहेत.


