निवडणुकीत गाफील राहिलो तर कार्यक्रम लागतो – डॉ. सुजय विखे पाटील
वांबोरीत भाजप महायुतीची बैठक; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अक्षय कर्डिले यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार
अहिल्यानगर : राहुरी-पाथर्डी-नगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ वांबोरी येथे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला वांबोरी परिसरातील शेतकरी, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत मार्गदर्शन करताना डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, निवडणुकीत गाफील राहिलो की कार्यक्रम लागतो. याचे जिवंत उदाहरण म्हणजे संगमनेर होय. या ठिकाणी सेतूवाला आमदार होतो, पण माझाही कार्यक्रम लोकांनी फिट केला. त्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले, मात्र जनता ऐकायला तयार नव्हती.
ते पुढे म्हणाले की, त्या निवडणुकीत ‘हिरा’ निवडून आला. तो इतका तेजस्वी आहे की जिल्ह्यातील कुठल्याही प्रकरणात त्याचे नाव येते. आता खरातील प्रकरणातही त्याचे नाव दिसते. मला पाडले नसते तर मी संगमनेर, नेवासा, पारनेर या विधानसभा निवडणुकीत गेलो नसतो. मला पाडण्यासाठी मोठे रिंगण लावले गेले आणि ते यशस्वी झाले.
आपल्या खासदारकीच्या काळातील कामांचा उल्लेख करत ते म्हणाले, माजी खासदार असताना लोकांनी मला मोठे प्रेम दिले. त्यामागचे कारण म्हणजे विकासाची कामे.
वांबोरी परिसराच्या विकासाबाबत त्यांनी सांगितले की, येथील युवकांसाठी क्रीडा संकुल उभारण्यात येणार असून या माध्यमातून चांगले खेळाडू तयार होतील. वांबोरी चारी टप्पा एकचे नूतनीकरण पूर्ण झाले असून टप्पा दोनचे कामही मार्गी लावले जाणार आहे. तसेच वांबोरी येथील जुनी शासकीय चारी सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. या भागातील शेती सिंचनाखाली आणण्याचेही नियोजन आहे.
ते पुढे म्हणाले, आम्ही खोटे आश्वासन देत नाही. गेली चाळीस वर्षे साकळाई पाणी योजना होणार असे सांगितले जात होते, मात्र ते काम आम्ही पूर्ण केले. पाणी हे नागरिकांचे मत परिवर्तन घडवते. पुढील पन्नास वर्षे नगर समृद्ध राहील.
राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले की, राहुरी तालुक्याला विकासाच्या दृष्टीने पुढे न्यायचे आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी निवडणूक न लढवण्याचा घेतलेला निर्णय सकारात्मक आहे, त्याबद्दल त्यांचे आभार. राहुरीतील अनेक वर्षांचा संघर्ष आता थांबला आहे. संघर्षातून अर्थकारण वाढते, पण विकास होत नाही.
ते पुढे म्हणाले की, स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली. त्या कामांची परतफेड करण्याची जबाबदारी आपली आहे. आपला पक्ष एक नंबरचा असून अक्षय कर्डिले यांना एक नंबरनेच आमदार करायचे आहे.
साखर उद्योगाबाबत त्यांनी सांगितले की, १२ हजार टन क्षमतेचा कारखाना सुरू करण्यात आला असून त्यामुळे कोणाचाही ऊस शिल्लक राहणार नाही.
ते पुढे म्हणाले, पुढील काळात अहिल्यानगर जिल्ह्यात तीन लोकसभा मतदारसंघ होतील. आज सकाळी सात वाजल्यापासून नगर-मनमाड रस्त्यावर उभे राहून काम सुरू केले असून या कामासाठी तीन किलोमीटर पायी चाललो.
शेवटी त्यांनी सांगितले की, राजकारण हे एका दिवसाचे नसून लोकांच्या जीवनात बदल घडवण्याचे माध्यम आहे. माणसे ओळखण्यासाठी गुण असावे लागतात. वांबोरीत आलो की सुभाष पाटील हे नाव पुढे येते. वांबोरी परिसरातील नागरिकांनी अक्षय कर्डिले यांना मोठ्या मताधिक्याने आमदार करण्याचा निर्धार केला आहे.
यावेळी ज्येष्ठ नेते सुभाष पाटील म्हणाले की, स्वर्गीय आमदार अरुण काका जगताप यांच्या माध्यमातून माझी आणि स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांची मैत्री झाली. कर्डिले यांची काम करणाऱ्या माणसाची ओळख आहे. त्यांच्या कामाला मते देऊन अक्षय कर्डिले यांना आमदार करायचे आहे.
ते पुढे म्हणाले, वांबोरी चारीचे शिल्पकार कै. बाळासाहेब विखे पाटील आहेत. डॉ. सुजय विखे हे फक्त डॉ. नसून न्युरोसर्जन आहेत. लोकांच्या डोक्यात काय चालते हे त्यांना समजते. काम करणाऱ्या लोकांकडेच जनता जाते आणि लोकदरबारात प्रश्न मार्गी लागतात, त्यामुळेच गर्दी होते.
उमेदवार अक्षय कर्डिले यांनी आपल्या भाषणात सांगितले की, माझ्या वडिलांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. सर्वांना सोबत घेऊन मतदारसंघात विकासाची गंगा आणायची आहे. त्यामुळे मतदारांनी विकास कामांसाठी मतदान करावे.
या बैठकीला उमेदवार अक्षय कर्डिले, ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, भाजप तालुकाध्यक्ष सुरेश बानकर, सुखदेव कुसमुडे, विक्रम तांबे, हरिभाऊ कर्डिले, उदयसिंह पाटील, प्रभाकर हरिश्चंद्र, किरण ससाणे, भाऊसाहेब साठे, प्रशांत नवले, अशोक उंडे, ज्ञानदेव शिंदे, सुरेश सुंबे यांसह वांबोरी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(चौकट) वांबोरीतील या बैठकीतून भाजप महायुतीच्या प्रचाराला जोरदार चालना मिळाली असून, अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीभोवती जनसमर्थन मोठ्या प्रमाणात एकवटत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून आले.


