जर खरात भोंदू असल्याचे माहिती होते, तर तुमचे एवढे निकट संबंध कसे? लंकेंचा विखेंना सवाल

“आधी घरातलं पाहा, मग टीका करा”

खरात प्रकरणावरून लंके-विखे आमनेसामने

राहुरी पोटनिवडणुकीच्या प्रचारात खासदार नीलेश लंके यांचा घणाघात

विखे कुटुंबीयांच्या फोटोचा उल्लेख करत थेट प्रत्युत्तर

अहिल्यानगर : प्रतिनिधी

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून विविध घोटाळ्यांच्या मुद्द्यावरून खासदार नीलेश लंके यांना नाव न घेता लक्ष्य केले होते. यावर आता लंके यांनी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान माध्यमांशी बोलताना जोरदार पलटवार केला आहे. विशेष म्हणजे, विखे कुटुंबीयांचा एक फोटो समोर आणत त्यांनी थेट सवाल उपस्थित करत राजकीय वातावरण तापवले आहे.

“कोणतीही सभा असो, निवडणूक असो किंवा धार्मिक कार्यक्रम असो, आमच्यावर टीका केल्याशिवाय त्यांचे काही होत नाही,” असा टोला लगावत लंके म्हणाले की, अलीकडेच एका नेत्याने जिल्ह्यातील एका व्यक्तीचा उल्लेख करत खरात प्रकरणाशी जोडण्याचा प्रयत्न केला. “पण ज्यांच्याकडून टीका होते, त्यांच्या घरातच खरातची देवपूजा केली जात होती, हे आधी त्यांनी तपासावे,” असा उपरोधिक वार त्यांनी केला.

खरात प्रकरणाशी संबंधित संपर्क आणि संबंधांचा उल्लेख करताना लंके यांनी थेट विखे कुटुंबावर बोट ठेवले. “अहिल्यानगर जिल्ह्यात या प्रकरणात सर्वाधिक संबंध कोणाचा होता, तर तो विखे कुटुंबाचाच होता. त्यांच्या नातेवाइकांचा, घरातील सदस्यांचा खरातशी संपर्क होता. आता हेच विसरून ते आमच्यावर टीका करत आहेत,” असे सांगत “आधी आपल्या घरातील लोकांचे फोटो तपासा आणि मग दुसऱ्यांवर आरोप करा,” असा सल्लाही त्यांनी दिला.

निवडणुकीच्या मुद्द्यांवर बोलताना लंके यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भर दिला. “राहुरी असो वा इतर कोणतीही निवडणूक, मुख्य मुद्दे शेती, उत्पादनाला योग्य बाजारभाव आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हेच असले पाहिजेत. आम्ही संसदेतही कांदा दर, दूध दरवाढ आणि निर्यातीच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

राहुरी पोटनिवडणुकीत सर्वसामान्य मतदारांचा सहभाग निर्णायक ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करत लंके म्हणाले, “शेतकरी आणि सामान्य नागरिकांनी ही निवडणूक हातात घेतली आहे. दरम्यान, प्राजक्त तनपुरे यांनी वैयक्तिक कारणास्तव निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असून, त्यावर भाष्य करणे योग्य नाही. मात्र प्रत्येक क्षणी निवडणुकीचे चित्र बदलत आहे.”

प्रचारात मोठ्या प्रमाणावर मंत्र्यांचा सहभाग आणि मुख्यमंत्रीदेखील मैदानात उतरणार असल्याचा उल्लेख करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. “एका सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवाराविरोधात संपूर्ण यंत्रणा उतरली आहे, यावरूनच जनतेची ताकद दिसून येते,” असे ते म्हणाले.

दरम्यान, लंके यांनी उल्लेख केलेल्या फोटोबाबतही चर्चा रंगली आहे. या फोटोमध्ये विखे कुटुंबातील नातेवाइक राजेश परजणे हे अशोक खरात आणि नामकर्ण आवारे यांच्या सोबत बसलेले दिसतात. “जर खरात भोंदू असल्याचे माहिती होते, तर एवढे निकट संबंध कसे?” असा थेट सवाल लंके यांनी उपस्थित केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles