राज्यात बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सगळ्यांच्याच नजरा दहावीच्या निकालाकडे लागल्या आहेत. दहावीच्या निकालाची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. एकीकडे सगळ्या बोर्डांचे निकाल जाहीर आहेत. या दरम्यान आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार, याची अपडेट समोर आली आहे. उद्या म्हणजेच १३ मे रोजी १० वीचा निकाल जाहीर होणार आहे.
यंदा १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. या परीक्षेसाठी राज्यातील २३ हजार ४९२ माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यानंतर विद्यार्थ्यासमोबतच पालकही निकालाची वाट पाहत होते, मात्र ही प्रतीक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल उद्या, अधिकृत संकेत स्थळावर दुपारी १ वाजता पाहता येणार आहे. उद्या दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना बोर्डाच्या आणि अन्य संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येईल. त्यानंतर आपापल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल.
https://results.digilocker.gov.in
 https://sscresult.mahahsscboard.in
 http://sscresult.mkcl.org
 https://results.targetpublications.org
राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार ऑनलाइन निकालानंतर दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने मिळवलेल्या गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन https://mahahsscboard.in स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यासाठी आवश्यक सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणी-छायाप्रतीसाठी १४ ते २८ मे या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येईल. तसेच शुल्कही ऑनलाइन भरता येईल.
फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून, छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे, शुल्क भरणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या दहावीच्या परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या तीन संधी (जून-जुलै २०२५, फेब्रु. मार्च २०२६ व जून-जुलै २०२६) श्रेणी / गुणसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


