चार महिन्याच्या आत महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे कोर्टाने आदेश देताच राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महायुतीच्या रणनीतीवर भाष्य केलेय. ते पुण्यामध्ये बोलत होते. ज्या ठिकाणी युती होणार नाही, त्या ठिकाणी वेगळं लढू असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या मुदतीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे. आम्ही वेळेत या निवडणुका घेण्याचा प्रयत्न करू. ज्या भागात पावसाचा जोर असेल त्या भागात निवडणूक काही दिवसांसाठी पुढे ढकलण्याची विनंती करू. याबाबत सरकार आणि निवडणूक आयोग योग्य तो समन्वय राखेल. पण वेळेत निवडणुका पूर्ण झाल्याच पाहिजेत, असा आमचा प्रयत्न आहे.
महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाऊ
“महापालिकेच्या निवडणुकांना महायुती म्हणूनच सामोरे जाणार आहोत. अपवादात्मक परिस्थितीत काही ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवली जाईल. शेवटी ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. जिथे तुल्यबळ स्पर्धक असतील तिथे अपवादात्मक परिस्थितीत वेगळे लढावे लागले तरी एकमेकांवर टीका न करता आम्ही चांगली स्पर्धा करू. कार्यकर्ते अनेक वर्ष प्रभागात काम करतात, त्यांना संधी द्यायला हवी. निवडणूकपूर्व वेगळी लढत झाली तरी निवडणुकीनंतर निश्चितच युती होईल”, असेही ते यावेळी म्हणाले.


