प्रधानमंत्री घरकुल योजना मुदत वाढीसाठी शिवसेना आक्रमक
घरकुल मागणीसाठी मुदतवाढ व कामचुकार ग्रामसेवकांवर कारवाई व्हावी: सोमनाथ कांडके
नगर : प्रधानमंत्री घरकुल योजनेसाठी शासनाकडून अहिल्यानगर जिल्ह्यात ग्रामसेवकां मार्फत व सेल्फसर्वे करण्यात आला. या सर्वेची मुदत 15 मे 2025 पर्यंत होती. परंतु ही योजना गावागावांमध्ये राबवत असताना, ग्रामसेवकांच्या कामकाजात दिरंगाई व हलगर्जीपणा दिसून आला. त्यामुळे स्वतःच्या मालकीच्या घरापासून वंचित असणाऱ्या गरजू लोकांपर्यंत ही योजना पोहोचलीच नाही. त्यामुळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांना सेल्फ सर्वेसाठी मुदतवाढ व कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाईसाठी, शिवसेना (उबाठा) गटाचे युवासेना जिल्हा उपप्रमुख सोमनाथ कांडके यांनी निवेदन दिले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक गरजू लाभार्थ्यांकडे स्वतःचे पक्के घर नाही. अशा अनेक लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा फायदा झाला असता. त्यासाठी ग्रामस्तरावर योजनेच्या माहितीसाठी ग्रामसेवकांनी व प्रशासनाने योग्य प्रचार-प्रसार करणे अपेक्षित होते. त्याचबरोबर काही लाभार्थ्यांचा सर्वे ग्रामसेवकांनी योग्य वेळेत करणे अपेक्षित होते. मात्र तसे न झाल्याने लाभार्थी स्वतःच्या हक्काच्या पक्क्या घरापासून वंचित राहणार आहेत.
त्याचप्रमाणे लाभार्थ्यांना सेल्फ सर्वे करताना उपलब्ध असणाऱ्या ॲप बाबत अडचणी येत आहेत. शिवाय फॉर्म मधील जॉबकार्डची अट देखील अडचणीची ठरत आहे. कारण अनेकांकडे जॉब कार्ड सध्या उपलब्ध नाही किंवा ते मुदतबाह्य झालेले आहेत.
त्यामुळे युवासेनेच्या वतीने निवेदन देऊन, घरकुल योजनेत दिरंगाई करणाऱ्या ग्रामसेवकांवर योग्य कारवाई, सेल्फ सर्वेसाठी मुदतवाढ, तसेच जॉब कार्डची अट शिथिल करने यासाठी निवेदन देण्यात आले. संबंधित मागण्या मान्य न झाल्यास, वंचित लाभार्थ्यांसह जिल्हा परिषदेत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.
 यावेळी युवासेना जिल्हा उपप्रमुख सोमनाथ कांडके, युवासेना तालुकाप्रमुख प्रवीण गोरे, संजय गांधी निराधार समिती सदस्य तथा ग्राम पंचायत सदस्य बाबासाहेब धीवर, महादेव दरंदले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


