महाराष्ट्रात मागील २४ तासांत मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. मराठवाड्यात ६० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहिल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. आज सकाळी मुंबई आणि उपनगरांत हलक्या पावसाने हजेरी लावली, तर ठाण्यात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना आजपासून पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या अनेक भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मागील चार दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत होते. तर पारनेर तालुक्यातील सुपा येथे दुपारच्या टप्प्यात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली. अचानक आलेल्या पावसामुळे सकल भागात पाणी साचलं होते. या पावसामुळं वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे.
राज्यात वळीवाच्या पावसाचा कहर सुरू असताना याचा फटका तळकोकणालाही बसला आहे. सिंधुदुर्गातील वैभववाडीत जोरदार वळीवाच्या पावसाने हजेरी लावली. एकीकडे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी बळीराजाला आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.


