एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या बिंगो जुगार अड्ड्यांवर छापा

अहिल्यानगर-पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार भिंगार कॅम्प पोलिसांनी तोफखाना व एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या बिंगो आणि हारजितीच्या जुगार अड्ड्यांवर रविवारी (10 मे) सायंकाळी धडक कारवाई करत चार वेगवेगळ्या ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. या कारवाईत एकूण सहा लाख 35 हजार 850 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 20 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी आणि तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शहरातील विविध भागात बिंगो व जुगार सुरू असल्याची माहिती अधीक्षक सुदर्शन यांना मिळाल्यानंतर त्यांनी भिंगारचे सहाय्यक निरीक्षक जगदीश मुलगीर यांना कारवाईचे आदेश दिली. त्यानुसार उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे व योगेश पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापे टाकले. पहिली कारवाई आंबेडकर चौक, गांधीनगर-बोल्हेगाव येथे करण्यात आली. येथे पोलिसांनी दोघांना पकडले. एक लाख 21 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. दुसरी कारवाई शेंडी बायपास परिसरातील दूध डेअरी चौकाजवळ, हॉटेल मातोश्री शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये करण्यात आली. येथे बिंगो जुगार सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी नऊ जणांना पकडले. त्यांच्याकडून दोन लाख 36 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शेंडी बायपास परिसरातील हॉटेल भाग्यश्री शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बिंगो जुगार अड्ड्यावरही पोलिसांनी कारवाई केली. या ठिकाणी पाच जणांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून एक लाख 49 हजार 700 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नवनागापूर, दूध डेअरी चौक परिसरातही पोलिसांनी छापा टाकला. येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये बिंगो जुगार सुरू असल्याचे आढळून आले. या कारवाईत चार जणांना ताब्यात घेण्यात आले व एक लाख 28 हजार 350 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत अंमलदार निसार शेख, रवींद्र टकले, दीपक शिंदे, नंदकुमार पठारे, प्रमोद लहारे, इस्त्राईल पठाण, रामनाथ डोळे, कैलास शिरसाठ आणि पोपट देव्हारे यांनी सहभाग घेतला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles