परकीय चलन वाचवण्यासाठी केंद्र सरकारने सोने-चांदीच्या आयातीवर १५ टक्के शुल्क लागू केले आहे. परिणामी भारतीय सराफा बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतीत तेजी पाहायला मिळत आहे. याउलट आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या दोन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतीत सुरू असलेल्या विक्रमी तेजीला आज ब्रेक लागला. आज (१५ मे २०२६) बाजार उघडताच गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्याने मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर मोठी घसरण पाहायला मिळाली.
जागतिक स्तरावर सोन्याच्या किमतीवर दबाव निर्माण झाल्याने भारतीय बाजारपेठेतही त्याचे पडसाद उमटले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव सध्या ४,६१५ डॉलर प्रति औंसच्या आसपास आहे. अमेरिकन डॉलर आणि बॉण्ड यील्डमध्ये झालेल्या रिकव्हरीमुळे गुंतवणूकदारांनी सोन्यासारख्या सुरक्षित मालमत्तेतून पैसे काढून इतर पर्यायांकडे वळवले आहेत, ज्याला बाजारपेठेत ‘रिस्क-ऑन सेंटिमेंट’ म्हटले जाते.
सोन्याच्या तुलनेत चांदीमध्ये झालेली घसरण अधिक तीव्र होती. एमसीएक्सवर चांदीचा भाव सकाळी २,९३,४८० रुपये प्रति किलो होता, जो काही वेळातच २,८९,२९७ रुपयांपर्यंत खाली आला. अवघ्या काही मिनिटांत चांदीच्या दरात किलोमागे सुमारे १०,००० रुपयांची मोठी पडझड झाली आहे. चांदीचा वापर औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होत असल्याने युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम किमतीवर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
सलग दोन दिवसांपासून सोन्याच्या भावात घसरण सुरू आहे. आज मुंबईत 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 1, 62,340 आहे. तर 11 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,48,810 आहे. दिल्ली येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,62,270 आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅम 1,48,930 आहे. सोन्यावरील आयात कर वाढवला असला तरीही सोन्याचा भाव घसरताना दिसत आहे.


