बैलगाडा शर्यतीनंतर गोळीबारात करताना स्वतःच जखमी झालेल्या युवकाला नेवासा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे.सुयश नानासाहेब नवथर (रा. पिंपरी शहाली, नेवासा) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. नेवासा तालुक्यातील पिंपरी शहाली येथे ही घटना गेल्या रविवारी घटना घडली. त्यानंतर जखमी झालेला सुयश नवथर फरार झाला होता. तो पुन्हा पिंपरी शहाली गावात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी काल, शुक्रवारी त्याला अटक केली. त्याच्याकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आला असला तरी गोळीबाराची घटना नेमकी कशामुळे घडली याची चौकशी केली जात असल्याची माहिती नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी दिली.
पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी शहाली गावामध्ये रविवारी यात्रा होती. या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी घेण्यात आलेली नव्हती किंवा त्यासाठी परवानगी मागणारा अर्जही देण्यात आलेला नव्हता तसेच पोलीस बंदोबस्तही मागवण्यात आला नव्हता.
बैलगाडा शर्यत झाल्यानंतर सुयश नवथर याने गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. गोळी त्याच्या उजव्या पायाच्या घोट्याला लागून तो जखमी झाला. मात्र याची तक्रार कोणीही पोलिसांकडे नोंदवली नाही तसेच कोणीही नवथर याने आपल्यावर गोळीबार केला, अशी तक्रार दिली नाही. गावठी कट्टा हाताळताना निष्काळजीपणे गोळी उडाल्याचे तो सांगत असला तरी पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केली आहे. पोलीसांनी त्याच्याकडून २० हजार रुपये किंमतीचा, स्टीलचा, देशी बनावटीच्या गावठी कट्टा जप्त केला आहे. यासंदर्भात पोलिस अंमलदार नारायण डमाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील करत आहेत.


