गेल्या काही महिन्यांपासून भाव खाणारे सोने-चांदी आता काहीसे नरमले आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच सोमवार, २५ मे रोजी देशांतर्गत सराफा बाजारातून ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. आज सकाळी देशातील बहुतांश प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किमतीत घसरण नोंदवली गेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर आणि कच्चे तेल यांच्या दरात झालेल्या घसरणीमुळे जागतिक स्तरावर सोन्याला बळ मिळाले असले, तरी भारतीय बाजारात मात्र सोन्या-चांदीच्या किमती खाली आल्या आहेत.जागतिक बाजारात डॉलरचा कमकुवतपणा आणि कच्चे तेल प्रति बॅरल १०० डॉलरच्या खाली आल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात ‘स्पॉट गोल्ड’ १.४ टक्क्यांच्या वाढीसह ४,५७०.८८ डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहे. दुसरीकडे, अमेरिका आणि इराण यांच्यात ६० दिवसांच्या अंतरिम शांतता कराराचा संपूर्ण मसुदा समोर आला असून, दोन्ही देशांमध्ये अण्वस्त्रांच्या कराराबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनीही इराणसोबतचा करार बऱ्याच अंशी निश्चित झाल्याचे स्पष्ट केले आहे. या भौगोलिक-राजकीय तणावमुक्तीच्या संकेतांमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीला तात्पुरता ब्रेक लागला आहे. मात्र, गेल्या आठवड्यात २४ कॅरेट सोने २,१३० रुपयांनी, तर २२ कॅरेट सोने १,९५० रुपयांनी महागले होते.
सोन्यापाठोपाठ चांदीच्या किमतीतही घसरण सुरूच आहे. २५ मे रोजी सकाळी भारतीय बाजारात चांदीचा भाव २,८४,९०० रुपये प्रति किलोग्रामवर आला आहे. विशेष म्हणजे, याच वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात चांदीने ४ लाख रुपये प्रति किलोचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला होता, त्या तुलनेत चांदी आता लक्षणीय स्वस्त झाली आहे. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र स्पॉट सिल्व्हरचा भाव ३.९ टक्क्यांच्या वाढीसह ७८.४२ डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे.
Gold-Price: सोन्याच्या किमतीत घसरण ; जाणून घ्या १० ग्रॅमचा दर….
- Advertisement -


