अहिल्यानगर जिल्ह्याला पहिले शासकीय मेडिकल कॉलेज; खासदार निलेश लंके यांच्या पाठपुराव्याला यश; कापूरवाडीत २५ एकर जागेवर उभारणार भव्य प्रकल्प
अहिल्यानगर – जिल्ह्याच्या आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्ह्याला पहिले सरकारी मेडिकल कॉलेज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून नगर तालुक्यातील कापूरवाडी येथे सुमारे २५ एकर जागा जवळपास निश्चित करण्यात आली आहे.
राज्य शासनाने या प्रकल्पासाठी तब्बल ५०० कोटी रुपयांची तरतूद केली असून महाविद्यालयासाठी ४४८ पदांची निर्मिती करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत चालू शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयाचे प्रशासकीय कामकाज जिल्हा आयुष रुग्णालयातून सुरू करण्यात येणार आहे.
महाविद्यालयाच्या डीनपदी डॉ. अविनाश लांब यांची नियुक्ती करण्यात आली असून यावर्षी नीट (NEET) परीक्षेच्या निकालानंतर १०० एमबीबीएस जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सप्टेंबर २०२६ पासून प्रत्यक्ष अध्यापन सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) पुढील सात वर्षांसाठी वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. ४३० खाटांचे हे रुग्णालय शिक्षणासोबतच सर्वसामान्य रुग्णांसाठीही कार्यरत राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वैद्यकीय प्रशिक्षणाची संधी मिळणार असून जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम होणार आहेत.
विशेष म्हणजे, अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत सरकारी वैद्यकीय महाविद्यालय नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पुणे, नाशिक, औरंगाबाद किंवा इतर जिल्ह्यांमध्ये शिक्षणासाठी जावे लागत होते. आता जिल्ह्यातच सरकारी मेडिकल कॉलेज उपलब्ध होत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी निर्माण होणार आहे.


