राज्यात विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या घडामोडी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची एक नुकतीच बैठक पार पडली होती. त्या बैठकीत सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात वाद झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. दरम्यान, आता वाद झाल्याच्या या चर्चांवर छगन भुजबळ यांनी मोठा खुलासा केला आहे.
विधानपरिषद निवडणुकीच्या जागावाटपाबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी एकत्र संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी राष्ट्रवादीच्या एका बैठकीतील वादाच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला. यावर छगन भुजबळ यांनी ‘हम साथ साथ है’, असं म्हणत वाद झाल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या एका बैठकीत सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात वाद झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता छगन भुजबळ म्हणाले की, “हम साथ साथ है. आमच्यात काहीही वाद नाही. मात्र, वाद आहे असं पसरवण्याचं काम आपण लोकांनी केलं आहे. आमच्यात काहीही वाद झालेला नाही. मात्र, कोणी बोलत असेल आणि त्याला आपण म्हटलं की थांब-थांब, थोडं लवकर आवर, असं असतं. या पलिकडे काहीही नाही. तुम्ही लोकांनी सांगितलं की आमच्यात वाद आहे आणि आता पाहा हम साथ साथ है”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.


