Friday, February 20, 2026

शिक्षकांना मोठा दिलासा ……मार्च 2025 च्या संच मान्यतेला जैसे थे ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

मार्च 2025 च्या संच मान्यतेला जैसे थे ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश – सुनिल पंडित ; शिक्षकांना मोठा दिलासा
नगर – शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये संच मान्यतेमुळे अनेक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या शून्यावर गेल्याने संबंधित शिक्षक अतिरिक्त झाले होते. या शिक्षकांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला असून, 15 मार्च 2025 च्या संच मान्यतेला जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे संबंधित शिक्षकांना त्यांच्या मूळ शाळांमध्येच काम करण्याची परवानगी मिळाली असून, कोणतीही शाळा बंद होणार नाही, हा मोठा दिलासा मिळाला आहे.
याचिकाकर्त्या शिक्षकांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ श्री. अरविंद गोपाळराव आंबेटकर यांनी काम पाहिले. दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने अ.नगर येथील शिक्षक भवनामध्ये विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित म्हणाले, शिक्षक हे राष्ट्रनिर्माते असतात. प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे जर त्यांच्यावर अन्याय होत असेल, तर तो थांबवण्याची जबाबदारी संघटनेची आहे. कोणत्याही शिक्षकावर अन्याय होऊ देणार नाही, यासाठी संघटना सदैव कटिबद्ध आहे. आम्ही शाळा वाचवल्या आहेत, आता शिक्षकांचे हक्कही वाचवणार. त्यांनी यावेळी सर्व शिक्षकांनी एकजूट राहून संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles