पेट्रोल-डिझलेच्या दरवाढीनंतर आता एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. आजपासून (१ जून २०२६) देशभरातील व्यावसायिक आणि छोट्या व्यापाऱ्यांना आणखी एक मोठा आर्थिक फटका बसला आहे. तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. या नव्या दरवाढीमुळे रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, केटरर्स आणि हजारो लहान व्यावसायिकांचे बजेट पूर्णपणे कोलमडणार आहे. परिणामी सर्वसामान्य ग्राहकांना बाहेर जेवणासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे. सुदैवाने, घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.या ताज्या दरवाढीनंतर दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत ४२ रुपयांची वाढ झाली असून, तो आता ३,११३.५० रुपयांना मिळणार आहे. तर कोलकात्यात सर्वाधिक म्हणजेच ५३.५० रुपयांची वाढ झाल्याने तिथला दर ३,२५५.५० रुपयांवर पोहोचला आहे.केवळ मोठे सिलेंडरच नव्हे, तर ५ किलोच्या फ्री ट्रेड एलपीजी सिलेंडरच्या किमतीतही ११ रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीत आता हा छोटा सिलेंडर ८२१.५० ला मिळेल. याचा फटका विद्यार्थी आणि बाहेर राहणाऱ्या नोकरदारवर्गाला बसणार आहे.चालू वर्षाच्या सुरुवातीचा विचार केला, तर व्यावसायिक गॅसच्या किमतीने व्यावसायिक आणि सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. जानेवारीमध्ये दिल्लीत ज्या सिलेंडरची किंमत १,६९१.५० रुपये होती, ती अवघ्या पाच महिन्यांत तब्बल १४०० रुपयांपेक्षा जास्त वाढली आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कडाडल्याने तेल कंपन्यांनी त्याचा भार ग्राहकांवर टाकला आहे. गेल्या काही दिवसांत पेट्रोल ७.३५ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ७.५३ रुपये प्रति लीटर महाग झाले आहे. दरम्यान, कच्चे तेल पुन्हा एकदा १०० डॉलर प्रति बॅरलच्या पार झाल्याने याचा परिणाम इंधन दरवाढीवर होणार असल्याचे स्पष्ट आहे. तज्ज्ञांच्या मते पेट्रोल-डिझेलच्या किमती १७ ते २० रुपयांपर्यंत टप्याटप्याने वाढू शकतात.
पेट्रोल-डिझेलनंतर LPG किमतीचा भडका! एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ
- Advertisement -


