राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवाराच्या नावाची अधिकृत घोषणा केली. राष्ट्रवादीने भंडाऱ्याच्या राजेंद्र जैन यांच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली. सुनील तटकरे यांनी उमेदवाराची घोषणा केल्याने आता राज्यसभेच्या उमेदवारीचा सस्पेन्स संपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची आज रविवारी मुंबईत बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते बैठकीला उपस्थित होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, छगन भुजबळ, समीर भुजबळ, दिलीप वळसे पाटील आदी नेते उपस्थित होते. या बैठकीत राज्यसभा उमेदवारी कोणाला द्यायची, यावर बराच वेळ चर्चा झाली. छगन भुजबळ यांनी समीर भुजबळ यांना उमेदवारी देण्यात यावी, असं आग्रह बैठकीत घेतला होता.
दुसरीकडे राज्यसभेच्या जागेसाठी छगन भुजबळ यांच्या नावाबरोबरच बीडचे अमरसिंह पंडित, भंडाराचे राजेंद्र जैन यांच्या नावाचीही बैठकीत चर्चा झाली. छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेते आग्रही होते. परंतु समीर भुजबळ यांना मंत्री करण्यास भाजप श्रेष्ठींकडून नकार आल्याची माहिती आहे. परंतु छगन भुजबळ यांनी समीर भुजबळ यांना मंत्री केले, तरच राज्यसभेवर जाणार असल्याची अट घातल्याने तिढा वाढला. पुढे बराच वेळ चर्चा झाल्यानंतर भंडाऱ्याचे राजेंद्र जैन यांचे नाव निश्चित केले. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना राजेंद्र जैन यांच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा केली. राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर छगन भुजबळ माध्यमांशी न बोलता निघून गेले. त्यांच्यासोबत समीर भुजबळ देखील तात्काळ देवगिरी बंगल्यावरून निघाले. त्याचबरोबर या राज्यसभेच्या उमेदवारीसाठी नवनीत राणा यांच्याही नावाची चर्चा होती. परंतु अंतिम क्षणी राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आली.
राष्ट्रवादीचं धक्कातंत्र, भुजबळांचा पत्ताकट ,राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यसभेसाठी उमेदवार ठरला; सुनील तटकरेंनी केली नावाची घोषणा
- Advertisement -


