राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवसांपूर्वी दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या सात खासदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याची चर्चा आहे. यातील एका खासदाराला केंद्रात मंत्रिपद तर इतरांनाही मानाची पदं देण्याची ऑफर शिंदेंना दिल्याचं बोललं जातं आहे. विशेष म्हणजे आपल्या खासदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ठाकरेंच्या पक्षाचे माजी खासदार विनायक राऊतांनी केला आहे.
2024मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या पक्षांचे नऊ खासदार विजयी झाले होते. दक्षिण मंबईतून अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई, धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर,यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख,हिंगोलीतून नागेश पाटील आष्टीकर, परभणीतून संजय जाधव,नाशिकमधून राजाभाऊ वाझे,शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे, उत्तर पूर्व मुंबईतून संजय दिना पाटील हे विजयी झाले होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी शिर्डीत झालेल्या ठाकरेंच्या पक्षाच्या मेळाव्याला खासदार भाऊसाहेब वाकचौरेंनी दांडी मारली होती…अशातच आता ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू असतानाच वाकचौरैंनी याबाबत काहीही बोलणं टाळलं आहे.ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांबाबत यापूर्वीही अशाच चर्चा झाल्या होत्या. विशेष म्हणजे एप्रिल महिन्यात शिवसेनेचे… केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला खासदार नागेश आष्टीकर आणि खासदार संजय देशमुखांनी हजेरी लावली. तर मुंबईत संजय दिना पाटील यांच्यासोबत एकनाथ शिंदेंनी एकाच कारमधून प्रवास केला होता. या सर्व घटनांची चर्चामुळं या जवळीकीला बळ मिळालं आहे. अशातच ठाकरेंच्या शिवसेनेनं आपले खासदार कुणाच्याही संपर्कात नसल्याचा दावा केलाय. तर शिंदेंच्या शिवसेनेनं या चर्चांबाबत सावध प्रतिक्रिया दिली आहे
राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा ;ठाकरेंचे 7 खासदार शिंदेंच्या संपर्कात?
- Advertisement -


