सुपा – पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा येथील नवीन एम.आय.डी.सी. मधील एका कंपनीत पाण्याचा टँकर कामाला लावण्याच्या वादातून एका सिव्हिल इंजिनिअरला बेदम मारहाण करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर, “इथे काम करायचे असेल तर महिन्याला हप्ता द्यावा लागेल” अशी धमकी देत खिशातील ५ हजार रुपये बळजबरीने काढून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
याबाबत सुनील पाटील (वय ४७, रा. सुपा, मूळ रा. पुणे) यांनी सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे ‘प्रि व्हीलेज विक्सन प्रा. लि.’ कंपनीमध्ये सिव्हिल इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. १० जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आरोपी रामदास सुधाकर इरकर (रा. पळवे, ता. पारनेर) हा कंपनीत आला आणि त्याने त्याचा पाण्याचा टँकर कामावर ठेवून घेण्याची मागणी केली. पाटील यांनी सध्या कंपनीत काम उपलब्ध नसल्याचे सांगताच आरोपीचा पारा चढला.
“आम्ही स्थानिक असून तुम्ही आम्हाला काम देत नाही, जर काम द्यायचे नसेल तर मला महिन्याला हप्ता द्यावा लागेल,” असे म्हणत आरोपीने इंजिनिअर पाटील यांना शिवीगाळ करत खाली पाडले आणि पाठीवर लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण केली. त्यानंतर पाटील यांच्या शर्टच्या खिशातील ५०० रुपयांच्या १० नोटा (एकूण ५,००० रुपये रोख) बळजबरीने हिसकावून आरोपी फरार झाला.
या प्रकरणी सुनिल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी आरोपी रामदास इरकर याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११९(१), ३५२, ३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल. केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुटे हे करत आहेत.


