शिवसेना ठाकरे गटातील वाद विकोपाला, मिलिंद नार्वेकरांच्या ‘त्या’ खोचक पोस्टमुळे ठाकरे सेनेतील वाद चव्हाट्यावर!

ठाकरेंच्या शिवसेनेतील सहा खासदार बंडखोरीच्या उंबरठ्यावर असल्याने पक्षनेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असतानाच, आता पक्षातील दोन नेत्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. कोकणातील आमदार भास्कर जाधव आणि विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. वर्धापन दिनी भास्कर जाधवांनी केलेल्या वक्तव्यावर मिलिंद नार्वेकरांनी आता बोचरी टीका केली असून, यासंदर्भात त्यांनी ‘एक्स’वर (ट्विटर) एक पोस्ट शेअर केली आहे.

१९ जून रोजी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन साजरा झाला. यावेळी शिवसेनेतील अनेक प्रमुख नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. उपस्थित नेत्यांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी प्रसारमाध्यमांनीही गर्दी केली होती. दरम्यान, भास्कर जाधव एका माध्यम प्रतिनिधीला प्रतिक्रिया देत होते, तेवढ्यात मागून मिलिंद नार्वेकरांची गाडी आली. समोर गर्दी असल्याने तिथून वाट काढण्यासाठी मिलिंद नार्वेकरांच्या चालकाने हॉर्न वाजवला.

गाडीचा सतत हॉर्न वाजत राहिल्याने भास्कर जाधवांनी तीव्र संताप व्यक्त केला. प्रतिक्रिया देण्यात अडथळा आल्याने, “नार्वेकर कोण लागून गेला?” असे उद्गार त्यांनी काढले. तसेच पुढे जात, “ही पद्धत बरोबर नाही. ते आमचे नेते असले म्हणून काय झालं?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मिलिंद नार्वेकरांपर्यंत पोहोचला. हा व्हिडिओ शेअर करत मिलिंद नार्वेकरांनी त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उद्धवजींच्या पत्राची लवकरात लवकर अंमलबजावणी करा; कारण यांच्या मानसिक त्रासाचा फटका आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांना बसत आहे!” असे मिलिंद नार्वेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत असताना, या अधिवेशनात भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेतेपद द्यावे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. याच पत्राचा संदर्भ घेत मिलिंद नार्वेकरांनी उपरोधिक टोला लगावला आहे. जाधवांना लवकरात लवकर विरोधी पक्षनेतेपद द्या, कारण त्यांच्या या मानसिक त्रासाचा फटका इतरांना बसत आहे, असे नार्वेकरांनी सुचवले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles