सोने आणि चांदी खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी तसेच सराफा बाजारातील गुंतवणूकदारांसाठी आज पुन्हा एकदा अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. जागतिक आणि देशांतर्गत बाजारातील दबावामुळे चालू आठवड्यात सलग तिसऱ्या दिवशी मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घसरण नोंदवली गेली आहे. आज, २५ जून २०२६ रोजी सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ४१० रुपयांनी घसरले असून, चांदीच्या दरात तब्बल १,९९० रुपयांची मोठी घट झाली आहे. आठवड्यात सोने ८६३० रुपयांनी स्वस्त झाले आहे.
इंडियन बुलियन वेबसाईटनुसार, देशातील सराफा बाजारात आज २४ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम सोन्याची किंमत १,४१,०३० रुपयांवर आली आहे. जवळपास ५ महिन्यानंतर पिवळ्या धातूची किंमत १,४०,००० च्या जवळपास आली. या वर्षीच्या सुरुवातीला सोन्याने विक्रमी १,८०,००० रुपयांची उच्चांक गाठला होता. उच्चांकापासून सोने आज ३८,९७० रुपयांनी स्वस्त झाले आहे. लग्नसराईपूर्वी सोन्यात घसरण झाल्याने खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
चंदेरी धातूचे दर आज १९९० रुपयांनी घसरल्याने प्रति किलोचा भाव आता २,११,७८० रुपयांवर आला आहे. जानेवारी २०२६ च्या सुरुवातीला चांदीने ४,०४,५०० रुपये प्रति किलोच्या विक्रमी भावाला स्पर्श केला होता. ही घसरण अशीच सुरू राहिली तर पुढील आठवड्यात चांदीची किंमत निम्म्याने कमी झाली असेल. औद्योगिक मागणीतील अनिश्चितता वाढल्याने चांदीच्या मागणीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे चांदीच्या किमती वेगाने खाली आल्या आहेत.


