विळद शिवारात रेल्वेखाली अल्पवयीन मुलीची आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू
अहिल्यानगर, : विळद ता. अहिल्यानगर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ रेल्वेखाली एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी 25 जून रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विळद येथील पाण्याच्या टाकीजवळ या मुलीने रेल्वे रुळावर जाऊन आपले जीवन संपवले. तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन शिंदे यांनी दुपारी 3.25 वाजता तपासणी करून तिला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी धाव घेतली. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस अंमलदार सांगळे यांनी घटनास्थळी भेट दिली.
कारण अद्याप अस्पष्ट
आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार सांगळे करीत आहेत. मृत मुलगी नवभारत विद्यालयाजवळ, ता. अहिल्यानगर येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.


